खारेपाटात साकारताहेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती!

खारेपाटात साकारताहेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती!

खारेपाटात साकारताहेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती!

गणपतीचे माहेरघर म्हणून संपूर्ण जगात ओळख असणार्‍या या तालुक्यातील वाशी-खारेपाट भागातील वढाव, दिव, तसेच परिसरातील इतर गावांमधून ईको फ्रेंडली अर्थात पर्यावरणपूरक मूर्ती साकारत असून, त्यासाठी मूर्तिकार अहोरात्र मेहनत घेत आहेत.

अवघ्या एक महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी लागणार्‍या मूर्ती आकार घेऊ लागल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी खारेपाट भागातील मूर्तिकार पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रदूषण विरहित लाल मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. या मूर्तींना अधिक मागणी असल्याने त्या घडविण्यासाठी या सर्वांना दिवस-रात्र मेहनत करावी लागत आहे. प्रदूषणमुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहचत असल्याने प्रदूषण विरहित गणेशमूर्ती तयार करण्याचा विचार करून लाल मातीपासून ट्री गणेशमूर्ती म्हणजे त्या सोबत गणेशमूर्तीच्या आकाराची कुंडी आणि वनस्पतीची बी दिली जाते.

जेव्हा गणेशमूर्तीचे विसर्जन या कुंडीमधे विसर्जित केले जाते. तसेच विसर्जन केल्यानंतर त्या वनस्पतीची बी कुंडीत टाकली जाते. काही दिवसांनी कुंडीत छानसे रोपटे तयार होते. यामुळे पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन तयार झालेल्या वनस्पतीपासून ऑक्सिजनचे प्रमाण वाढून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते. लाल मातीच्या या गणेशमूर्ती एक ते दोन फूट आकाराच्या बनविल्या जातात. यामध्ये एक फुटाच्या मूर्तींना विशेष मागणी आहे.

पूर्वी शहरापुरता मर्यादित असणारा हा व्यवसाय आज तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात पसरला आहे. यंदा किमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाशी-खारेपाट भागात वाशी, कणे, बोर्झे, वढाव, दिव, भाल येथील तरुण मंडळी शिकत असून नोकरी मिळत नाही त्यामुळे अनेक तरुण कारखान्यात गणेशमूर्ती तयार करण्यात वर्षभर व्यस्त आहेत. यातून अनेकांना रोजगार मिळतो. प्रदूषण विरहित ट्री गणेशमूर्तीचे वितरण कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्रप्रदेश, गोवा या राज्यांसह परदेशातील आस्ट्रेलिया, अमेरिका, आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये केले जाते.

पेण खारेपाटात भागातील मूर्ती कारखान्यांतून प्रदूषण विरहित गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे लाल मातीपासून ही मूर्ती तयार केली जाते. या मूर्तीला लागणारी माती शाडुच्या मातीपेक्षा महाग आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या मूर्तींसोबत कुंडी आणि वनस्पतीचे बी दिले जाते.
-अजित म्हात्रे, श्री स्वामी समर्थ कला केंद्र, दिव.

First Published on: August 4, 2021 4:15 AM
Exit mobile version