चव्हाण म्हणतात, ‘सेनेने लिहून दिलं’; शिंदे म्हणतात ‘अजिबात नाही’!

चव्हाण म्हणतात, ‘सेनेने लिहून दिलं’; शिंदे म्हणतात ‘अजिबात नाही’!

एकनाथ शिंदे अशोक चव्हाण

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात अस्तित्वात आल्यापासून विरोधक तिन्ही पक्षांमध्ये कधी वादाची ठिणगी पडतेय, याचीच वाट पाहात बसलेले असताना सत्ताधारी पक्षांनीच विरोधकांना ती संधी आपसूकच आणून दिली आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सरकारमधील मंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे विरोधकांना ही संधी मिळाली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान बोलताना केलेल्या वक्तव्याला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्याला धरून एकमत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना मध्ये पडावं लागतंय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नक्की झालं काय?

नांदेडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ‘संविधानाच्या व्यतिरिक्त घटनाबाह्य पद्धतीने सरकार काम करणार नाही, असं शिवसेनेकडून आम्ही लिहून घेतलं आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनीच आम्हाला तसे आदेश दिले होते. तसं नसेल, तर सरकारमधून बाहेर पडा, असे आदेश आम्हाला देण्यात आले आहेत’, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र आता, चव्हाणांच्या या वक्तव्यावर सत्तेतील प्रमुख घटकपक्ष शिवसेनेकडून खुलासा करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे म्हणतात, ‘आम्ही कुठे लिहून दिलं?’

दरम्यान, यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारणा केली असता ‘शिवसेनेने असं काहीही लिहून दिलेलं नाही’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. ‘तिन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणालाही काहीही लिहून देण्यात आलेलं नाही. आणि हे सरकार संविधानाच्या चौकटीत राहूनच चालणार आहे. ते आमच्यावर बंधनकारक आहे’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


वाचा सविस्तर – …तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, तसे आदेश आहेत-अशोक चव्हाण
First Published on: January 27, 2020 3:31 PM
Exit mobile version