विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय औटींची बिनविरोध निवड

विधानसभेच्या उपाध्यक्षपदी  विजय औटींची बिनविरोध निवड

विजय औटी

गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विजय औटी यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. औटी यांनी शिवसेना-भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. त्याचवेळी विरोधकांकडून या निवडणुकीसाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि अपक्षांचे उमेदवार म्हणून बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र या दोघांनी निवडणुकीपूर्वी आपले अर्ज मागे घेतल्याने औटी यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड बिनविरोध झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी औटी यांचे अभिनंदन केले.

विधानसभेत विरोधकांच्या तुलनेत भाजपचे १२३ आणि शिवसेनेचे ६३ आमदारांचे संख्याबळ होते. विरोधकांपेक्षा तगडे संख्याबळ असल्याने विजय औटी यांचा विजय निश्चित मानला जात होता. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हिप बजावण्यात आला होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक होणे अपेक्षित होते. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. हर्षवर्धन सकपाळ आणि बच्चू कडू यांनी अर्ज मागे घेतल्याने औटी यांचा एकट्याचाच अर्ज शिल्लक होता. यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आले होते. गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या विजय औटी यांनी बिनविरोध निवड झाली.

औटींना पारनेर खडतर
विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली असली तरी त्यांच्यासाठी त्यांचा पारंपारिक मतदारसंघ आता सुरक्षित राहिला नसल्याचे सांगितले जाते. शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या वाढत्या प्रभावामुळे औटी यांच्यापुढची अडचण वाढत आहे. वाढता प्रभाव लक्षात घेऊन औटी यांनी लंके यांच्याविरोधात पक्षांतर्गत कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले. लंके यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले. लंके यांच्यावरील कारवाई ही अन्यायकारक असल्याने शिवसैनिक त्यांच्याबाजूने एकवटले आहेत. २४ तास जनतेच्या सेवेत वाहून घेतलेले म्हणून लंके यांचा बोलबाला आहे. सामान्य घरातून उभरते नेतृत्व लंके यांच्या रुपात पारनेरमध्ये निर्माण झाल्याची भावना सैनिकांमध्ये आहे. पक्षाने कारवाई करूनही लंके यांनी कुठल्याही पक्षात प्रवेश घेतला नाही. आता येत्या निवडणुकीत ते अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले.

First Published on: December 1, 2018 4:13 AM
Exit mobile version