शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी शेलार, कोटकांवर

शिवसेनेला महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी शेलार, कोटकांवर

राज्यात भाजपला सत्तेपासून रोखणार्‍या शिवसेनेला मुंबई महापालिकेत दे धक्का देण्याचा पावित्र्यात मुंबई भाजप असून मुंबई महापालिकेतील सत्ताकारणांची जबाबदारी मुंबईचे माजी अध्यक्ष आणि आमदार ऍड.आशिष शेलार आणि खासदार आणि महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे शेलार आणि कोटक ही जोडगोळी शिवसेनेला सत्तेपासून कशी दूर ठेवते किंवा त्यांच्या नाकी दम आणते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्यातील सत्ताकारणाची समिकरणे ही मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे महापालिकेत सध्या तरी सत्ताधारी पक्ष सेफ झोनमध्ये असले तरी त्यांची धाकधुक वाढवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. महापालिकेतील सत्ता समिकरणे बदलण्यासाठी भाजपचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी विरोधी पक्षनेते रवी राजा, राष्ट्वादीच्या गटनेत्या राखीज ाधव यांच्यासह सपाचे गटनेते आमदार रईस शेख यांची बैठक घेतली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली असून खुद्द भाजपने, काँग्रेसकडे पाठिंबा मागितल्याने या चर्चेला तरी अधिकच उधाण आले.

मात्र, शिवसेनेच्या गोटात आता भाजपकडून अधिक भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेची जबाबदारी ही अ‍ॅड. आशिष शेलार आणि मनोज कोटक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांकडून फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला सोबत घेत शिवसेनेला दगाफटका करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेचे धाबे दणाणले असून त्यांनी आतापासून विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यास सुरुवात केले.

तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला मतदान करावे
आजवर महापालिकेत पहारेकरी म्हणून भाजपने भुमिका वठवत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. परंतु आता राज्यात शिवसेनेने, युतीपासून फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्वादीशी जवळकी केल्यामुळे शिवसेनेला मुंबई महापालिकेत सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नात भाजप आहे. मात्र, भाजपला काँग्रेससह विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भाजपने उमेदवार न देता, काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजुने मतदान करत शिवसेनेची सत्ता उलथवून टाकायची,असाही मतप्रवाह भाजपच्या नगरसेवकांमधून निर्माण होत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले, तरच भाजपला शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवता येणार आहे. त्यामुळे येणार्‍या १८ नोव्हेंबरला भाजपने उमेदवार न दिल्यास, भाजपची रणनिती स्पष्ट होईल. किंबहुना पुन्हा एकदा तटस्थ राहत शिवसेनेकडून सहानभूती मिळवत राज्यातील सत्तेची समिकरणे युतीचे सरकार स्थापन करेल,अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

First Published on: November 16, 2019 2:09 AM
Exit mobile version