शिवाजी पार्कवर बुधवारी कलावंतांचा एल्गार मोर्चा

शिवाजी पार्कवर बुधवारी कलावंतांचा एल्गार मोर्चा

लॉकडाऊनमुळे लोककलावंतांवर देखील उपासमारीची पाळी आली असून सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे या मागणीसाठी बुधवारी १६ सप्टेंबर रोजी शिवाजी पार्क चैत्यभूमी या ठिकाणी फेडरेशन ऑफ आर्टिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कलावंतांचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. राज्यातील वेगवेगळ्या कला क्षेत्रातील लोकशाहीर तमाशा कलावंत, नाट्यकलावंत, कीर्तनकार, भारूडकार, भजनी मंडळ, साहित्यिक, लेखक, गीतकार, कवी, शायर, हिंदी-मराठी-गुजराती-पंजाबी-तेलुगू-तमिळ-कन्नड आणि इतर भाषेत पार्श्वगायक, लोकगीत गायक, कव्वाल इत्यादी तंत्रज्ञान-निर्मात्यांच्या विविध संघटनांना एकत्रित करून फेडरेशन पार्टी स्थापन करण्यात आली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे प्रचंड आपत्कालीन परिस्थितीमधून जात असल्यामुळे या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. परंतु, गेल्या पाच महिन्यांपासून ह्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले आहेत, तर कलावंतांवर उपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे या कलावंतांची राज्य सरकारने दखल घ्यावी आणि त्यांना योग्य ती मदत व सहकार्य करावे, अशी मागणी फेडरेशनचे समन्वयक व संगीत कला अकादमीचे संस्थापक मनोज संसारे यांनी केली आहे. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता दादर चैत्यभूमी येथे मोठ्या संख्येने आम्ही एकत्रित येऊन याचा निषेध करणार असून कलावंतांचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने कलावंत या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

First Published on: September 14, 2020 5:35 PM
Exit mobile version