मोटारमॅनच्या रिक्त पदे तात्काळ भरा

मोटारमॅनच्या रिक्त पदे तात्काळ भरा

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या लोकल चालवणार्‍या मोटारमॅनचे रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या मागणीवरून रेल कामगार सेनेने सीएसएमटी स्थानकावर रेल्वे विरोधात एक दिवसीय आंदोलन केले. सोबत रेल कामगार सेनेकडून मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदनही दिले.मागील कित्येक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या मार्गवर मोटरमनची संख्या कमी असल्यामुळे सद्यपरिस्थितीत काम करणार्‍या मोटारमनवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. याबद्दल अनेक तक्रारी मध्य रेल्वेकडे आल्या होत्या, मात्र त्यावर मध्य रेल्वेकडून फक्त वरवरची मलपट्टी करण्यात येत होती.

त्यांच्या विरोधात रेल कामगार सेनेने मंगळवारी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एक दिवसीय आंदोलन केले. हे आंदोलन रेल कामगार सेनेचे एस.के. जोशी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. नुकतेच २२९ मोटरमनची पदे रिक्त असल्यामुळे मोटरमनला अतिरिक्त काम करावे लागत होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मोटरमननी अतिरिक्त काम करण्यास नकार दिला होता. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर यांच्या परिणाम पडला होता. त्यामुळे लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते. मात्र त्यानंतर मध्य रेल्वेच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आज २२९ पदांपैकी फक्त मोटरमनची १०९ पदे मध्य रेल्वेकडून भरण्यात आली आहेत. मात्र सद्य परिस्थितीत १२० पदे मोटरमनची रिक्त आहेत. त्यामुळे आजही मध्य रेल्वेच्या मोटरमनला ओव्हर टाईम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होत आहे. मध्य रेल्वेने मोटरमनचे रिक्त पद तत्काळ भरावे, अशी मागणी रेल कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेवर लोकलच्या एकूण १३३ गाड्या असून दिवसाला लोकलच्या १ हजार ७३२ फेर्‍या होतात. या माध्यमातून ४२ लाख प्रवाशी दररोज मध्य रेल्वेवर प्रवास करतात. या गाड्या चालविण्याकरता ८९८ मोटरमनची गरज आहे. परंतु सद्यपरिस्थितीत ७७१ मोटरमन कार्यरत आहेत. त्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण मोटरमनवर येत आहे. याचा विपरीत परिणाम मोटरमनच्या कौटुंबिक जीवनावरही पडत आहे. ओव्हर टाईममुळे मोटरमन आपल्या कुटुंबियांना वेळ देऊ शकत नाहीत. अतिरिक्त कामाच्या ताणामुळे त्यांच्याकडून अपघात होण्याची शक्यता जास्त असते. यासंबंधी रेल्वे कामगार संघटनांकडून रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे प्रशासन यावर वरवरची मळपट्टी करत आहे, असा आरोप मध्य रेल्वेचे मोटरमन करत आहेत.

First Published on: December 5, 2018 5:39 AM
Exit mobile version