जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची गोपनीयता फुटली कशी?

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची गोपनीयता फुटली कशी?

ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची बातमी इतकी गोपनीय ठेवण्यात आली होती की, ती कुठल्याही पत्रकारांना कळलीच नाही. त्यातच काही तासांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या एका ट्विटने ती चक्रीवादळात परिवर्तित झाली, आव्हाड अटक असे म्हटल्यावर अतिमहत्त्वाची म्हणून पोलिसांकडून खात्री करण्यासाठी फोनाफोनी झाली. पण ही बातमी गोपनीय असताना ती फुटली कशी असा प्रश्न राहून राहून उपस्थित होतो. एक तर बातमी पोलीस खात्यातून फुटली असावी किंवा ई-कोर्ट सर्व्हिस याच्या मार्फत लीक झाली असावी अन्यथा राजकीय वादांतून सरकविण्यात आली असावी, अशा एक ना अनेक शंका-कुशंका वर्तविल्या जात आहे.

ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही जणांना अटक झाली होती. याचदरम्यान करमुसे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी तीन प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यातील मुख्य सूत्राला अटक व्हावी अशी मागणी होती. त्यानुसारच न्यायालयाने आव्हाड यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. एकीकडे गुरुवारी सकाळच्या सुमारास ९ हजार जणांच्या घरांची लॉटरी त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. त्याच्या आनंदात असताना, अचानक दुपारी पावणेतीन ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक झाली. त्यांना तातडीने ठाणे न्यायालयात हजर केले. मात्र, याबाबत प्रचंड अशी गोपनीयता बाळगण्यात आली होती. त्यांची जामिनावर मुक्तताही झाली.

याचदरम्यान गृहनिर्माण मंत्री आव्हाड हे टेंभी नाक्यावरील दुर्गामातेच्या दर्शनाला आले असावे, त्यानंतर ते न्यायालयात आले असावे. असा कयास वर्तविला जाऊ लागला. पण हळूहळू ती वार्ता न्यायालयात लीक झाली असली तरी ती कशी व्हायरल झाली नाही हा प्रश्न राहून राहून समोर येत आहे. अटकेनंतर जवळपास पाच ते सहा तास उलटले होते. याबाबत गोपनीयता असताना गुरुवारी रात्री जवळपास साडेनऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास भाजप नेते सोमय्या यांनी ट्विट केले. तेव्हा मुंबई- ठाण्यातील प्रसारमाध्यमे आणि राजकीय मंडळी उडाली. त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. हे खरे आहे का? याबाबत तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली. माध्यम प्रतिनिधींनी आपआपल्या परीने कोणी पोलीस, न्यायालय तर काही राजकीय मंडळींमधील असलेले सोर्स वापरण्यास सुरुवात केली. त्यातच पोलीस दलातून त्याबाबत खात्रीलायक दुजोरा मिळाला. त्याच्या नंतर गृहनिर्माण मंत्र्यांना अटक होऊन जामिनावर मुक्तता झाली याच्यावर शिक्कामोर्तब झाले.

पण, एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याला अटक होते. त्याची माहिती कोणालाच कशी समजली नाही, असा प्रश्न प्रसारमाध्यमांना राहून राहून पडला आहे. प्रसारमाध्यमांना समजत नाही; पण राजकीय मंडळींना समजते. त्यानंतर ती समाजापुढे येते. पण, आव्हाडांना अटक ही गोपनीय बातमी फुटली कशी हाच प्रश्न पडला असताना, ती बाब एकतर पोलीस दलातून नाहीतर ई -कोर्ट सर्व्हिस नाहीतर राजकीय वादंगातून उघड झाली असावी. यावरून किती काही केले तरी भिंतीला कान असतात किंवा कितीही मोठे पोट असले तरी कोणतीच गोष्ट पोटात राहत नाही हे तितकेच खरे आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे.

First Published on: October 16, 2021 6:45 AM
Exit mobile version