लक्षणे नसलेले रुग्णही आता जास्त व गंभीर रुग्णांच्या यादीत!

लक्षणे नसलेले रुग्णही आता जास्त व गंभीर रुग्णांच्या यादीत!

मुंबईत सप्टेंबर महिन्यापासून कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. परंतु यातील ७० ते ८० टक्के कोविड बाधित रुग्ण हे लक्षणे नसलेले असून अशा रुग्णांना महापालिकेच्या ‘सीसीसी-टू’ मध्ये दाखल करण्याऐवजी थेट जंबो फॅसिलिटी अर्थात समर्पित कोविड काळजी केंद्रात दाखल केले जात आहे. परिणामी रुग्णालयीन उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ दिसून आहे. विभागातील ‘सीसीसी-टू’ बंद करून तेथील रुग्णांना खाटा रिकाम्या असल्याने जॅम्बो फॅसिलिटीमध्ये पाठवले जात आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईत मंगळवारी एकूण १६२८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी १ सप्टेंबरपर्यंत  या बाधित रुग्णांचे प्रमाण ८०० ते ९००वर आले होते. परंतु त्यानंतर हे प्रमाण वाढून २२०० ते २३०० पर्यंत गेले होते. पण वाढलेले हे प्रमाण आता कमी होवून पुन्हा १६०० पर्यंत आले आहे. महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या अँटीजेन टेस्ट तसेच संपर्कातील लोकांची अधिक प्रमाणात केल्या जाणाऱ्या चाचण्यांमुळे बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. परंतु यामध्ये जास्तीत जास्त रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना अलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली विभागातील ‘सीसीसी-टू’ मध्ये ठेवले जाते. रुग्णाला लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना याठिकाणी ठेवले जाते. ज्यामुळे दाखल रुग्णाला भीतीही वाटायची नाही. परंतु मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या अधिपत्याखाली असलेली बहुतांशी ‘सीसीसी-टू’ ही केंद्र बंद करण्यात आले आहे.

मुंबईत सध्या ‘सीसीसी-टू’ मध्ये २९१६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर जंबो फॅसिलिटी व रुग्णालयांमध्ये १४ हजार ७२८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. मुंबईत गोरेगाव नेस्को, बीकेसी, रिचडनस अँड क्रुडास, वरळी एनएससीआय यासारखी जंबो फॅसिलिटीच्या कोविड केअर सेंटर उभारण्यात आली आहे. याठिकाणी जास्त किंवा गंभीर रुग्णाला दाखल केले. परंतु जुलै व ऑगस्टमध्ये रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आल्यानंतर या डिसीएचसी अर्थात जंबो फॅसिलिटीच्या आरोग्य केंद्रांमधील खाटा रिकाम्या असल्याने महापालिका प्रशासनाने सौम्य व लक्षण नसलेल्या रुग्णांना ‘सीसीसी-टू’ मध्ये दाखल करण्याऐवजी याठिकाणी दाखल करण्याच्या सूचना केल्या.त्यामुळे लक्षणे नसलेले आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आता जंबो फॅसिलिटीमध्येच दाखल केले जात आहेत. परिणामी लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले रुग्णही आता जास्त व गंभीर रुग्णांमध्ये गणले जावू लागले आहे. परिणामी या जास्त व गंभीर रुग्णांची आकडेवारी पाहून मुंबईकरांच्या मनात भीतीचे वातावरण  पसरु लागले आहेत.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी घेतलेल्या आढावा बैठकीतही या वाढत्या आकड्यांबाबत चिंता व्यक्त केली. परंतु हा आकडा केवळ जंबो फॅसिलिटीमध्ये लक्षणे नसलेले रुग्ण दाखल केल्याने वाढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यापूर्वी ‘सीसीसी-टू’मध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा आकडा मोठा होता आणि याठिकाणांहून बरे होवून जाण्याचे प्रमाणही ८० ते ८५ टक्के होते. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जंबो फॅसिलिटीमधील खाटा रिकाम्या असताना ‘सीसीसी-टू’मध्ये रुग्ण दाखल करून अधिक ताण का वाढवायचा? त्यामुळेच प्रशासनाने तसा निर्णय घेत जंबो फॅसिलिटीमध्ये सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी वेगळा कक्ष केला आहे. त्यामुळे एखादा रुग्णाला लक्षणे दिसू लागल्यास किंवा त्यांना जास्त त्रास जाणू लागल्यास त्वरीत येथीलच आयसीयूमध्ये दाखल करता येते.


हे ही वाचा – Bollywood Drug Probe: दीपिका,सारा आणि श्रध्दाला NCB ने बजावला समन्स!


First Published on: September 23, 2020 7:15 PM
Exit mobile version