अखेर जगदीश परिहार मुंबईत परतला

अखेर जगदीश परिहार मुंबईत परतला

जगदीश परिहार

मला नोकरी करायची होती, स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, मात्र कुटुंबीयांनी कधी बाहेरच पडून दिले नाही, म्हणून त्यांना न सांगता मी घरातून निघून गेलो होतो, असे महिनाभरापूर्वी गूढरित्या बेपत्ता झालेला मुलुंड येथील तरुण जगदीश परिहार याने मुंबईत परतल्यावर पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. जगदीश रविवारी पहाटे दुबई येथून मुंबईत परतला. त्याच्या मागावर असलेल्या तपास यंत्रणेकडून त्याची दिवसभर चौकशी केली. त्याच्या बोलण्यात तपास यंत्रणेला काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

मुलुंड पश्चिम येथे कुटंबीयांसह राहणारा जगदीश परिहार हा २० वर्षांचा उच्चशिक्षित तरुण २२ ऑक्टोबर रोजी मुंबई विद्यापीठात जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने सायंकाळी घरी फोन करून कळवले की ‘मी हिंदू धर्माला मानत नाही, मी खूप दूर जात आहे, परत कधीही येणार नाही’, असे सांगून फोन बंद करून ठेवला होता. तसा उल्लेख जगदीशचा भाऊ भावेश याने मुलुंड पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत केला होता. तसेच मागील एक वर्षांपासून जगदीश तो पाकिस्तानी तरुणीच्या फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होता, त्याने लॅपटॉपही फॉर्मेट केल्याचे भावेशने पोलिसांना सांगितले. त्यामुळे दहशतवाद विरोधी पथक, केंद्रीय तपास यंत्रणा यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली होती.

जगदीशला कुठल्याही परिस्थितीत भारतात परत आणण्यासाठी तपास यंत्रणेचे प्रयत्न सुरू होते. अखेर २५ नोव्हेंबर रोजी सकाळी तो मुंबईत आला. मुंबईत आलेल्या जगदीशला या प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. पोलिसांना दिलेल्या माहितीत त्याने आपला कुठल्याही पाकिस्तानी तरुणीशी कधीही संबंध आलेला नाही, मी मुस्लिम धर्म स्वीकारत आहे असेही कधी बोललो नसल्याचा खुलासा जगदीशने जबाबात केला.
मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते, मला नोकरी करायची होती, परंतु नोकरी करण्यास घरच्यांचा विरोध होता. अखेर वर्षभरापूर्वीच मी परदेशात जाण्याचा व नोकरी करण्याचा निश्चय केला. त्यासाठी मी वर्षभरापूर्वीच इंटरनेटच्या मदतीने दुबईतील एका एजंटचा नंबर मिळवला होता, त्याने मला व्हिसा पाठवून दुबईत राहण्याची सोय केली होती. दुबईत जाण्यासाठी घरच्यांची परवानगी दिली नसती म्हणून त्यांना खोटे बोलून घरातून बाहेर पडलो आणि विमानतळावर पोहचलो, तेव्हा त्यांना मी कामासाठी बाहेर जात असून वाट बघू नका एवढेच सांगून फोन बंद केला.

दुबईत सुरवायझरची नोकरी

दुबईत मी पर्यटन व्हिसावर गेलो होतो, पेईंग गेस्ट म्हणून एका ठिकाणी राहू लागलो आणि काही दिवसानी एजंटच्या मदतीने एका कंपनीत साफसफाई सुपरवायजर म्हणून नोकरी मिळाली. मात्र मुंबईत परत येऊन अधिकृतपणे नोकरीचा व्हिसा मिळवून परत जाण्याचा निर्णय घेतला होता.

First Published on: November 27, 2018 5:00 AM
Exit mobile version