मुंबईच्या सेवेत आलेल्या ST कर्मचाऱ्यांना दररोज देणार २२५ रुपये भोजनभत्ता

मुंबईच्या सेवेत आलेल्या ST कर्मचाऱ्यांना दररोज देणार २२५ रुपये भोजनभत्ता

कोरोना काळ्यात अनेक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्टच्या सेवेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आता दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली आहे.

गेली दोन महिने एसटीच्या सुमारे १ हजार बसेस मुंबईतील बेस्ट वाहतूकच्या मदतीसाठी धावत आहेत. त्यासाठी सुमारे ४ हजार ५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत एका खासगी संस्थेला देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आणि संबंधित कंपनीकडून जेवण पुरविण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन सदर खासगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करून सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री परब यांनी दिले होते. त्यानुसार एसटी प्रशासनातर्फे त्वरित कार्यवाही करून सदर भोजन व्यवस्था बंद करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोज २२५ रुपये भोजनभत्ता देण्याची व्यवस्था केली आहे.

तसेच दिलेल्या निर्देशानुसार, कर्मचारी राहत असलेल्या निवासव्यवस्थेची रोजच्या रोज पाहणी करण्यासाठी मध्यवर्ती आणि क्षेत्रीय कार्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ७ पथके तयार करण्यात आली असून त्यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांना पुरवविण्यात येणाऱ्या निवासव्यवस्थेबाबत अहवाल मध्यवर्ती कार्यालयास सादर करण्यात येणार आहे.

यापुढे बेस्ट सेवेसाठी राज्यातील विविध भागातून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मुंबई राहण्याची व जेवणाची कोणतीही गैरसोय होऊ नये, याबाबतची योग्य ती काळजी घेतल्याचे निर्देश मंत्री परब यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.


हेही वाचा – नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णत: सुरु – वडेट्टीवार


 

First Published on: November 5, 2020 1:29 PM
Exit mobile version