महिलेच्या गर्भाशयातून काढला १२ सेमीचा फायब्रॉइड

महिलेच्या गर्भाशयातून काढला १२ सेमीचा फायब्रॉइड

गरोदर महिला

खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एका महिलेच्या गर्भाशयातून १२ सेमीचा फायब्रॉइड काढण्यात यश आलं आहे. ३८ वर्षीय टिना या झुंबा क्लासमध्ये असतानाच अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. तातडीने त्यांना मदरहूड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हा ओटीपोटाची चाचणी केली असता त्यांच्या पोटाचा आकार २४ आठवड्यांच्या गरोदरपणाइतका मोठा झाल्याचे आढळले. म्हणून त्यांना अल्ट्रासाउंड चाचणी करण्याचा सल्ला देण्यात आला. यात १२ इंच लांब आणि १० इंच रुंद फायब्रॉइड गर्भाशयात असल्याचे निदान झाले. त्यानंतर काही काळाने त्यांच्यावर मायोमेक्टॉमीने उपचार करण्याचं डॉक्टरांनी ठरवलं.

पोटातील फायब्रॉइड आकाराने मोठा

याविषयी मदरहूड हॉस्पिटलमधील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी सांगितलं की, “त्यांच्या पोटातील फायब्रॉइड आकाराने मोठा होता. त्यात सर्व पॉलिपॉइडल (मांसवृद्धी) मध्ये बदल झाले होते आणि गर्भाशयाच्या पोकळीतही त्यातील काही भाग होता. त्यामुळे, त्यांच्यावर लॅप्रोस्कोपिक हिस्टेरेक्टॉमी करण्यात आली. आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे.”

हा आजार दुर्मिळ आहे 

तसंच, वयाची तिशी ओलांडल्यानंतर संप्रेरकांच्या परिणामांमुळे अनेक महिलांमध्ये फायब्रॉइड दिसून येतात. संप्रेरकांमधील बदलांमुळे गर्भाशयाच्या स्नायूंच्या स्तराची वाढ झाल्याने फायब्रॉइड निर्माण होतात. पण, १२ सेमीचा २४ आठवड्यांच्या गरोदरपणासारखा दिसणारा फायब्रॉइड खुपच दुर्मीळ असतो. प्रत्येक महिलेने दर वर्षी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे आणि वयाच्या तिशीनंतर दर वर्षी अल्ट्रासाउंड चाचणीही करून घ्यावी असा सल्ला ही डॉ. सिद्धार्थ देतात.

या कारणांनी होऊ शकतो फायब्रॉईड 

गर्भाशयातील फायब्रॉइड्स हे सौम्य ट्युमर असून ते गर्भाशयाच्या पटलावर वाढतात. एका ट्युमरच्या रुपात किंवा अनेक ट्युमरच्या स्वरुपांमध्ये त्यांची वाढ होते आणि सफरचंदाच्या बी च्या आकारापासून ते कलिंगडाच्या आकारापर्यंत विविध आकारांमध्ये हे ट्युमर वाढू शकतात. स्त्रीच्या मासिक पाळीदरम्यान आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होणे हे अशा प्रकारचे ट्युमर असल्याचे लक्षण असते. त्याचप्रमाणे फायब्रॉइड्समुळे वेदना, वारंवार मूत्रविसर्जन, बद्धकोष्ठता आणि ओटीपोटाला सूज अशी लक्षणे दिसून येतात. काही वेळा यामुळे गर्भधारणेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

First Published on: February 27, 2019 7:56 PM
Exit mobile version