ठाण्यातील खड्डे तीन दिवसात भरा; पालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यातील खड्डे तीन दिवसात भरा; पालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यातील खड्डे (छाया - अमित मार्कंडे)

ठाण्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहरातील रस्ते कोणाच्याही मालकीचे असू द्यात त्यावरील खड्डे तीन दिवसात तातडीने भरा, असा आदेश ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरूवारी विशेष बैठक घेऊन बांधकाम विभागाला दिले. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षीही रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे युध्दपातळीवर काम करण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

रस्त्यांवर हजाराहून अधिक खड्डे

गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरूवात झाली आहे. ठाण्यामध्ये ठिकठिकाणच्या रस्त्यांवर एक हजाराहून अधिक खड्डे पडले आहेत. ठाण्यातील तीन हात नाका, नितीन कंपनी, विविध उड्डाणपूल आणि शहराच्या विविध भागात रस्त्यांना खड्डे पडल्याचं दिसून येत आहे. ठाण्यामध्ये सर्वाधिक ४३५ खड्डे माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत रस्त्यांवर पडले आहेत. वागळे इस्टेट मध्ये २५६ तर दिव्यामध्ये ११८ ठिकाणी खड्डे पडले आहेत. पालिकेनं एकूण ११२२ खड्ड्यांपैकी ७२३ खड्डे भरले आहेत. अजूनही ३९९ खड्डे बुजविण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदाही ठाणेकरांना खड्डयातूनच मार्गक्रमण करावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी पालिका आयुक्त जयस्वाल यांनी बांधकाम विभागाची बैठक बोलावली होती. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सिमेंटने किंवा डांबरचा वापर करून खड्डा भरणे अवघड होत आहे. त्यामुळे पाऊस सुरु असताना कोल्ड मिक्सचरचा वापर करून भरण्यात यावेत. रस्त्यावरील मोठे खड्डे भरण्यासाठी जेट पॅचर तसेच शक्य तेथे सिमेंट काँक्रीटचा वापर करून खड्डे भरण्याची मोहीम हाती घेण्यात यावी अशा सुचना जयस्वाल यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

हेही वाचा –

‘अल कायदाची धमकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही’

प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांसाठी घरे – मुख्यमंत्री

First Published on: July 11, 2019 7:40 PM
Exit mobile version