कोरोना रुग्ण संख्येच्या आढाव्यानंतर लोकल होणार सुरू! प्रवाशांना करावी लागणार गुरुवारची प्रतीक्षा

कोरोना रुग्ण संख्येच्या आढाव्यानंतर लोकल होणार सुरू! प्रवाशांना करावी लागणार गुरुवारची प्रतीक्षा

मुंबईत सध्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट होत आहे. त्यामुळे मुंबई ब्रेक द चैन अंतर्गत मुंबई तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर आली आहे. परंतु् नियम तिसऱ्या स्तरावरीलच लागू आहेत. मात्र रेल्वे प्रवासाची सर्व सामान्य जनतेला प्रतिक्षा आहे ; परंतु एमएमआर रिजनमध्ये कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा सखोल आढावा महापालिकांनी सादर केल्यानंतर राज्य सरकार रेल्वे प्रवासाचा मार्ग सर्वांसाठी खुला करण्याबाबत निर्णय घेऊ शकणार आहे. त्यासाठी गुरुवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. याठिकाणी मुंबईसह बाहेरील लाखो लोकांना नोकरी, रोजगार मिळतो. मात्र कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गेल्या मार्च २०२० पासून मुंबईसह अन्य शहरांची बिकट अवस्था झाली आहे. सुदैवाने मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर विविध उपाययोजना केल्याने जानेवारी २०२१ पर्यन्त कोरोना नियंत्रणात आला होता ; मात्र काही बेफिकीर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत फेब्रुवारी मध्यापासून वाढ होऊन कोरोनाची दुसरी लाट धडकली.

त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केले. मात्र मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा विविध उपाययोजना केल्याने मुंबई शहर तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या स्तरावर आले आहे.मात्र लॉकडाऊन पूर्णतः शिथिल केल्यास रुग्ण संख्या अधिक वाढण्याची शक्यता पाहता पालिकेने स्तर दोनच्या लाभापासून मुंबईला सध्या दूर ठेवले आहे. मात्र आता मुंबईच नव्हे तर एमएमआर रिजनमधील महापालिकांनाही कोरोनाबाबतच्या नियमांत अधिक शिथिलता मिळण्याची शक्यता असून रेल्वे सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मात्र त्यासाठी येत्या गुरुवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

मुंबईतील कोरोना बाधित रुग्ण संख्या घसरणीवर आली असली तरी रोज आढळणारे रुग्ण, ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता याचा आढावा घेत असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत कोरोना बाधित रुग्ण संख्येत घट होणे ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण संख्येची माहिती गुरुवारी राज्य सरकारला सादर करण्यात येईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.


First Published on: June 15, 2021 9:32 PM
Exit mobile version