अखेर तहसिल कार्यालयासमोरच्या नाल्याची दुरूस्ती

अखेर तहसिल कार्यालयासमोरच्या नाल्याची दुरूस्ती

नाल्याची दुरूस्ती

सार्वजनिक बांधकाम विभागाला अखेर अंबरनाथ तहसील कार्यालयासमोरील नाल्याची दुरुस्ती करण्याचा मुहूर्त सापडला आहे. सुमारे दोन वर्षांपासून अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या समोरील जागेत असलेल्या नाल्यावरील लोखंडी जाळ्या तुटल्या होत्या. नाल्याचा बहुतांश भाग खचल्याने वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लवकरात लवकर या नाल्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारी सुट्टीचा मुहुर्त साधत दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून डागडुजीची मागणी 

कल्याण बदलापूर रस्त्यावर असलेल्या अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या इमारतीत विविध विभागाचे काम चालते. अंबरनाथ पंचायत समिती, गृहसंस्था नोंदणी कार्यालय, गटविकास अधिकारी, विविध गावांचे तलाठी, विविध योजनांची कार्यालये आणि तहसिल कार्यालयाचे काम या इमारतीतून चालते. या इमारतीच्या आवारातच भूमि अभिलेख कार्यालयही आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरी भागासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक येथे येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून कार्यालयातील स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या नाल्यावरील लोखंडी जाळ्या तुटल्या होत्या. त्यामुळे नाल्याचा बहुतांश भाग खचला होता. खचलेल्या या भागातून तहसिल कार्यालय गाठणे नागरिकांसाठी आणि विशेषतः वाहनचालकांसाठी अडचणीचे झाले होते.

नाल्यातून होणाऱ्या दुर्गंधीमुळे रोगराई

अनेकदा दुचाकीस्वार या खचलेल्या नाल्यात अडकत होते. त्यात नाल्यात पाणी साचले असल्याने डासांची उत्पत्ती होत दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे नाल्याची दुरूस्ती करण्याची मागणी होत होती. मात्र याच्या दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकामाला पत्र देण्यात आल्याचे उत्तर तहसिलदारांकडून देण्यात येत होते. सार्वजनिक बांधकामाच्या कारभारावर यामुळे संताप व्यक्त होत होता. अखेर ऐन निवडणूकीच्या धामधुमीत आलेल्या बुधवारच्या महावीर जयंतीचा मुहुर्त साधत या कामाला सुरूवात करण्यात आली. एकाच दिवसात या नाल्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यातील महत्वाच्या भागातील जाळ्या काढून त्यासाठी मोठ्या वाहिन्या टाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. मात्र ज्याप्रमाणे नाल्याचे काम केले गेले त्याचप्रमाणे तहसिल कार्यालयातील स्वच्छतागृहांची आणि संपूर्ण इमारतीची स्वच्छताही वेळेत व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

First Published on: April 18, 2019 8:40 PM
Exit mobile version