कामगार रुग्णालयात आग; मृतांचा आकडा ९ वर

कामगार रुग्णालयात आग; मृतांचा आकडा ९ वर

कामगार रुग्णालयात अग्नितांडव; ९ जणांचा मृत्यू

अंधेरीमधील मरोळ या ठिकाणी असलेल्या कामगार रुग्णालयात सोमवारी सायंकाळी आग लागली होती. आग लागताच या ठिकाणी अग्नीशमन दलातर्फे मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. या आगीच्या घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता हा आकडा वाढला आहे. आज एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शीला मार्वेकर असे या महिलेचे नाव असून या महिलेचा आज उपचारादरम्यान सेव्हन हिल रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले होते?

अंधेरी मधील मरोळ येथे कामगार रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. अंधेरीच्या कामगार रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीत एकूण १४७ लोक जखमी झाले आहेत. तर या घटनेमध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सेव्हन हिल्समध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांचा कुपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे, तर एकाचा होली स्पिरीट रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर कूपर रुग्णालयामध्ये एकूण ४ जण गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. तर पाच लहान बाळांना होली स्पिरीट रुग्णालयामध्ये एन आयसीयू मध्ये दाखल केलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी अनेकांना धूराचा त्रास झाला आहे. तसेच ३५ जणांना हॉली‌ स्पिरीट रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून पाच नवजात बाळाला इथे आणण्यात आले असून एक नवजात बालकाचा मृतदेह आणण्यात आला होता.

अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत रुग्णालयात अडकलेल्या लोकांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले होते. या घटनेमध्ये १४७ जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. कूपर, होली स्पिरीट, बाळासाहेब ठाकरे ट्रोमा आणि सेव्हन हिल रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले. तर या घटनेमध्ये अग्निशमन दलाचे तीन जवान देखील जखमी झाल्याची माहिती समोर आली असून जखमींवर रुग्णालयात उपाचर सुरु आहेत.

First Published on: December 19, 2018 3:47 PM
Exit mobile version