‘गम है किसी की प्यार’च्या सेटला लागली आग : हजाराहून अधिक लोक उपस्थित, लाखोंचे झाले नुकसान

‘गम है किसी की प्यार’च्या सेटला लागली आग : हजाराहून अधिक लोक उपस्थित, लाखोंचे झाले नुकसान

मुंबई : गोरेगाव येथील फिल्म सिटीमधील दोन हजार चौरस फुटांच्या स्टुडिओमध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीर सदर स्टुडिओमधील ‘गुम है किसीके प्यार मे’चा शूटिंग सेट जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव येथील फिल्म सिटीमधील दोन हजार चौरस फुटांच्या एका स्टुडिओमध्ये सध्या शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ‘गुम है किसीके प्यार मे’ या टीव्ही सिरीयलचे शूटिंग सेट उभारण्यात आला आहे. या ठिकाणी या सिरीयलचे शूटिंग सुरू असते. शुक्रवारी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास सदर स्टुडिओमधील सेटला अचानकपणे आग लागली. ही आग अवघ्या १५ मिनिटात भडकली. या आगीत दोन हजार चौ.फूट जागेतील शूटिंगसाठी वापरण्यात आलेले इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी सामान, ज्वलनशील वस्तू आदी जळून खाक झाले. आगीची घटना घडल्याने सदर परिसरात एकच खळबळ उडाली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर काम हाती घेतले. मात्र तोपर्यंत आग आणखीन भडकली होती. त्यामुळे अग्निशमन दलाने सदर आग स्तर -२ ची असल्याचे सायंकाळी ४.५३ वाजता आणि आग आणखीन भडकल्याने आग स्तर -३ ची असल्याचे सायंकाळी ५.२२ वाजता जाहीर केले. अग्निशमन दलाने १२ फायर इंजिन व ७ वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर रात्री उशिराने नियंत्रण मिळविले. मात्र प्राथमिक माहितीनुसार सदर आगीमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत नाही.

तसेच, घटनास्थळी, स्थानिक पालिका कर्मचारी, पोलीस, अदानी वीज कंपनीचे अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी माहिती घेत आहेत.

निर्माता, प्रॉडक्शन हाऊसवर तक्रार दाखल
अखिल भारतीय सिने कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी या आगीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच निर्माता, प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुरेश श्यामलाल म्हणाले की, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालकांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. त्यांच्या निष्काळजीपणामुळे फिल्मसिटीमध्ये फायर सेफ्टीशिवाय मोठ्या प्रमाणावर शूटिंग होते आणि कोणत्याही प्रकरची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी नसते.

First Published on: March 10, 2023 6:10 PM
Exit mobile version