AC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, काही मिनिटांत आख्खं घर पेटलं!

AC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, काही मिनिटांत आख्खं घर पेटलं!

उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच एसीची गारेगार हवा खावीशी वाटत असते. घरात एसी असला, की बाहेरच्या उष्णतेचा विसर पडतो. पण हाच एसी जर नीट काळजी घेतली गेली नाही, तर किती गंभीर रूप धारण करू शकतो, हे कल्याणमध्ये घडलेल्या भीषण घटनेवरून स्पष्ट होऊ शकेल. कल्याणमधल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये एका घरात एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही मिनिटांतच आख्ख्या घरानं पेट घेतला. वेळीच अग्निशिमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यामुळे त्यांनी आग नियंत्रणात आणली आणि पुढचा मोठा अनर्थ टळला. अन्यथा आग इमारतीतल्या इतर फ्लॅटमध्ये देखील पोहोचली असली आणि मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली असती.

प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याणच्या उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या गोदरेज हिल्स परिसरामध्ये एकोरिना कॅसोरिना नावाची एक मोठी सोसायटी आहे. याच सोसायटीच्या एका इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावरच्या एका फ्लॅटमध्ये ही आग लागली. या घराच्या बेडरूममध्ये बसवण्यात आलेल्या एसीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि एसीनं पेट घेतला. घरातल्या सदस्यांना काही कळायच्या आत आग वेगाने फ्लॅटमध्ये पसरू लागली. घरातील सदस्यांनी लागलीच घराबाहेर जात प्रसंगावधान दाखवलं.

दरम्यान, आग या फ्लॅटच्या गॅलरीमधून वरच्या फ्लॅटच्या गॅलरीपर्यंत पोहोचू लागल्यामुळे सगळ्यांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र, अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. दरम्यान, संबंधित सोसायटीमध्ये अग्निशमन यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित नसल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या सोसायटीला नोटीस पाठवण्याची तयारी अग्निशनम विभागाकडून केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: November 17, 2020 5:01 PM
Exit mobile version