Mumbai Power Cut: जनरेटर अति उष्ण झाल्याने रुग्णालयाला आग; ४० रूग्णांचे दुसरीकडे स्थलांतर

Mumbai Power Cut: जनरेटर अति उष्ण झाल्याने रुग्णालयाला आग; ४० रूग्णांचे दुसरीकडे स्थलांतर

मुंबईला आज वीजेअभावी मोठा फटका बसला आणि विशेषत: कोरोनाच्या काळात तर हा फटका आणखी गंभीर बनला. सर्वसामान्यांच्या जीवनात खंड पडला असून यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. दरम्यान मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि नंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील अपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागल्याचे समोर आले आहे. अचानक आग लागल्याने रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मुलुंड पश्चिम येथील हे रूग्णालय कोरोना रूग्णांकरता असून यावेळी रुग्णालयात जवळपास ४० रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ११ बंब घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले असून ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. तर ८२ वर्षीय पांडुरंग कुलकर्णी यांना मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले होते. मात्र, त्यांचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी एक महिला रुग्ण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

यासह मुलुंडच्या अपेक्स रुग्णालयात आग लागल्यानंतर येथील ४० रुग्णांना फोर्टिस, मैथागर, मुलुंड जम्बो सेंटर आणि आस्था रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व रुग्णांवर या रुग्णालयांमध्ये पुढील उपचार सुरु आहेत.


Mumbai Power Cut: वीज पुरवठा खंडित कसा झाला? तातडीने चौकशी करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
First Published on: October 12, 2020 11:54 PM
Exit mobile version