शाळेचा पहिला दिवस…!

शाळेचा पहिला दिवस…!

शाळेत स्वागत (प्रातिनिधीक चित्र)

आज १४ जून, शाळेचा पहिला दिवस… महिनाभराच्या सुट्टीनंतर विद्यार्थ्यांचं रूटीन पुन्हा सुरू होणार. शाळेतील मित्र-मैत्रिणी भेटणार, शिक्षकांचा सहवास लाभणार. नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुगंध, कडक इस्त्रीचा युनिफॉर्म आणि पाठीवर दप्तर घेऊन कधी रेंगाळत जाणारी, कुठे पालकांना हात पकडून, कोणी स्कूल बसच्या खिडकीतून डोकावत शाळेत जातानाचे विद्यार्थी आपल्याला दिसतील. या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतात ते म्हणजे पहिल्यांदाच शाळेत जाणारे चिमुकले विद्यार्थी. आज त्यांचा शालेय जीवनात प्रवेश होत आहे.

शाळेचा पहिला दिवस (प्रातिनिधीक चित्र)

मुसमुसणाऱ्या डोळ्यांना क्लासरूमचे दर्शन

पालकांच्या सुरक्षित छायेतील चिमुकली मुलं शालेय जीवनात प्रवेश केल्यानंतर थोडं गोंधळणार हे नक्की. या गोंधळामुळेच बहुतांश मुलांना शाळेच्या गेटवरच रडू कोतळतं. इवल्याशा स्कूल बॅगेत कार्टूनचं चित्र असणारं टिफिन आणि पाण्याची बॉटल घेऊन घरातून निघालेली मुलं क्लासरूममध्ये प्रवेश करताना मात्र दरवाजातच थांबतात. मुसूमुसू रडणारे, आईची ओढणी धरून ठेवणारे चिमुकले हात शिक्षक हळूवार सोडवतात आणि क्लासरूममध्ये बसवतात.

क्लासरूम (प्रातिनिधीक चित्र)

बोबडे बोल क्लासरूममध्ये घुमणार

पहिल्यांदाच शाळेत प्रवेश करणाऱ्यांसाठी क्लासरूमची रचनाही आकर्षित केली जाते. चित्र रंगवलेली भिंत, टिपिकल बाकांऐवजी राऊंड टेबलची व्यवस्था, चॉकलेट देऊन मुलांचे स्वागत या विविध क्लृप्त्या शाळेकडून केल्या जातात. त्या त्या वयात शोभेल असे खेळ आणि शैक्षणिक उपक्रम शिक्षक राबवतात. पोएम, स्टोरी टेलिंग आणि गप्पांमध्ये मुलांना रमवण्याचा प्रयत्न होतो. काही वेळातच नवीन जागेची ओळख मुलांना होते आणि त्यांचे बोबडे बोल क्लासरूममध्ये घुमू लागतात.

चिमुकल्यांची शाळा (प्रातिनिधीक चित्र)

प्री प्रायमरी… पहिली पायरी

प्रामुख्याने ३ ते ६ वर्षांमधील मुलं प्री प्रायमरी शिक्षणासाठी पात्र ठरतात. सुरूवातीला किंडरगार्टन (बालवाडी), प्ले ग्रुप, प्री नर्सरी, नर्सरी, केजी, एलकेजी (लोअर किंडकगार्टन) आणि युकेजी (अप्पर किंडरगार्टन) या स्तरातून मुलांना जावं लागतं. त्यानंतर पहिलीच्या इयत्तेत ते प्रवेश घेतात.

First Published on: June 14, 2018 6:38 AM
Exit mobile version