देशातील कोरोना केंद्रातील पहिली आयसीयू सुविधा मुंबईत

देशातील कोरोना केंद्रातील पहिली आयसीयू सुविधा मुंबईत

देशातील कोरोना केंद्रातील पहिली आयसीयू सुविधा मुंबईत

मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयातील आयसीयू सुविधा कार्यान्वित झाली असून बुधवारपासून तेथे रुग्णांना दाखल करून घेतले जाणार आहे. याठिकाणच्या आयसीयू विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा घेण्यात घेण्यात येणार आहे. देशातील हा पहिला प्रयोग असल्याचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले. दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९५५ खाटांचे रुग्णालय उभारले असून त्याठिकाणी १०८ खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे. बीकेसी येथील १२० खाटांचे आयसीयू उभारण्यात आले आहे. तर मुलुंड येथे सिडकोमार्फत उभारण्यात आलेल्या १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा ऑक्सिजन सोयींयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. याठिकाणच्या ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सिडकोच्या सहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समुहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील १२० खाटांचे आयसीयू अशा ३ हजार ५२० बेड्सच्य सर्व सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पार पडले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. त्यातही अशी मोकळ्या जागेवरील रुग्णालयांमध्ये आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने देशासमोर ठेवली आहे. ह्या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यांचा दर्जा राखला गेला आहे. त्याची उभारणीही एखाद्या कायमस्वरुपी रुग्णालयां इतकीच भक्कमपणे झाली आहे. कोरोना बरोबरच युद्ध आपण नक्कीच जिंकू मात्र भविष्यातही अशाप्रकारे सांसर्गिक आजारांवर उपचारासाठी कायमस्वरुपी सोय होण्याच्या दृष्टीने मुंबई आणि परीसरात रुग्णालय उभारणीचे काम हाती घ्यावे, अशी सूचना केली.

तर महाराष्ट्र पहिले राज्य असेल

कोरोना रुग्णांच्या उपचार सुविधांची निर्मिती करताना महाराष्ट्राने देशासमोर आदर्श उभा केला आहे. ज्याप्रकारे उपाययोजना हाती घेतल्या आहेत ते पाहता कोरोनावर विजय मिळविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावेळी व्यक्त केला.

तर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोरोना उपचारासाठी जम्बो सुविधांचा आदर्श महाराष्ट्राने देशापुढे उभा केला आहे. त्यामध्ये देशातील पहिले राज्य जेथे ६० टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. या जम्बो उपचार सुविधांच्या माध्यमातून लोकांना जीवनदान देतानाच जगाला दिशा देण्याचे कामही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: July 7, 2020 8:17 PM
Exit mobile version