डोंबिवलीत मत्स्य मेजवानीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

डोंबिवलीत मत्स्य मेजवानीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक

प्रातिनिधिक छायाचित्र

मत्स्य मेजवानीचे आयोजन करून शेकडो नागरिकांकडून अॅडव्हॉन्स बुकिंग करून हजारो रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डोंबिवलीतील मानपाडा पाेलीस ठाण्यात मितेश गुप्ता, अरूण शिंदे आणि इतर यांच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील दावडी रोडवरील रिजन्सी इस्टेट ग्राऊंडवर २४ ते २६ मे पर्यंत मत्स्य मेजवानी कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आलं होतं. त्यासाठी जाहिरात पत्रक छापण्यात आलं होतं. कपल तिकिट १ हजार रूपये, सिंगल तिकिट ६०० रूपये आणि सहा ते १२ वर्षापर्यंत लहान मुलासाठी दीडशे रूपये तिकिट ठेवण्यात आले होते. तसेच अॅडव्हॉन्स बुकिंग करणाऱ्यांसाठी कपल तिकिट ८०० रूपये, सिंगल तिकिट ५०० रूपये तर लहान मुलांसाठी १०० रूपये अशा दरात अनलिमिटेड सुरमई, पापलेट, बांगडा आणि कोळंबी इत्यादीं माशांचे जेवण देण्यात येणार होते.

या जाहिरातीत www.matsyamejvani.com या वेबसाईटवर अॅडव्हॉन्स बुकिंग करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार डोंबिवली, बदलापूर, कर्जत, अंबरनाथ, पनवेल, दहिसर, मुलूंड या भागातील शेकडो नागरिकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग करून डेबिट कार्डद्वारे पैसे भरले होते. बुकिंग केल्यानंतर त्यांना ‘कस्टमर कोड आयडी’ इमेल करण्यात आला होता. २४ मेला रात्री आठ वाजता उद्घाटन होणार असल्याने बुकिंग केलेले साधारण २०० ते ३०० जण मस्य मेजवानीसाठी हजर होते. यावेळी ग्राऊंडला काळी कापडी कमान बांधण्यात आली होती. तसेच स्टेज आणि टेबल खूर्ची मांडण्यात आले होते. पण जेवणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती, असे नागरिकांनी सांगितले.

हा प्रकार पाहिल्यानंतर नागरिकांना संशय आला. त्यांनी जाहिरातीवरील मोबाईल नंबरवर संपर्क केला असता कॉलही उचलला गेला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेकडो नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यावर धाव घेऊन आयोजकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदर वेबसाइटही बंद करण्यात आली आहे.

First Published on: May 26, 2019 7:53 PM
Exit mobile version