मच्छिमार, मच्छी विक्रेत्यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा; प्रशासनाचा केला निषेध

मच्छिमार, मच्छी विक्रेत्यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा; प्रशासनाचा केला निषेध

मच्छिमार, मच्छी विक्रेत्यांचा आझाद मैदानात धडक मोर्चा; प्रशासनाचा केला निषेध

राज्य शासन आणि मुंबई महापालिकेकडून होत असलेला अन्याय व प्रलंबित समस्या याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मच्छिमार, तसेच मच्छी विक्रेत्यांनी बुधवारी आझाद मैदानात धडक मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या मोर्च्यात डहाणू, सातपाटी, उत्तन, वसई, पालघर, बोईसर, रायगड, कुलाबा, माहीम, खार दांडा, वरळी, ठाणे, भांडुप, पनवेल, नवी मुंबई इत्यादी ठिकाणांहून माजी नगरसेवक विलास चावरी, बर्नार्ड डिमेलो, संजय कोळी, नयना पाटील, ॲड. कमलाकर कांडेकर, प्रदीप टपके, विनोद पाटील, शुभांगी कुटे, राजश्री भांजी, प्रफुल भोईर, जी. एस. पाटील, दिगंबर वैती, संतोष मर्दे, विश्वनाथ सालीयान, कुंदन दवणे आदी सहभागी झाले होते.

मोर्च्यात सामील झालेल्या शिष्टमंडळाने उपआयुक्त रमेश पवार यांची भेट घेतली. मच्छीमारांच्या क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी मंडई संदर्भातील आरक्षण पुनर्स्थापित करण्याच्या मागणीला आणि दादर येथील मासळी मंडईच्या महिलांना पुन्हा त्याच जागी पुनर्वसन करण्याच्या मागणीला वरिष्ठांकडे सोपवण्यात येईल, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर मच्छीमारांच्या शिष्टमंडळबरोबर पालकमंत्री अस्लम शेख यांची बैठक झाली. यावेळी शेख यांनी, मच्छिमारांच्या मागण्या पालिकेकडून मान्य करण्यासाठी पालिका आयुक्तांसोबत एक बैठक घेऊन समाधानकारक तोडगा काढण्यात येईल. तसेच कोळीवाड्यांना गावठाणचे आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे देवेंद्र तांडेल यांनी सांगितले.

क्रॉफर्ड मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि दादर येथील सौ. मीनाताई ठाकरे मासळी मंडईवर पालिकेने कारवाई करून तेथील मच्छी विक्रेत्यांना हटवले. मात्र, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात आलेले नाही. यामागे मोठे षडयंत्र असून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही याठिकाणी मोठ्या संख्येने आलो आहोत, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी सांगितले.

राज्य शासन, मुंबई महापालिका व अन्य प्राधिकरण यांनी आमच्या मच्छी विक्रेत्यांच्या हक्काच्या जमिनी आणि मासळी मंडईतून हटवण्यात आले असून आम्हाला आमच्या जागा परत करण्यात याव्यात, अशी मागणी देवेंद्र तांडेल यांनी यावेळी केली. यासंदर्भात जर राज्य शासन व पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला अपेक्षित न्याय येत्या दहा दिवसात न दिल्यास आम्ही आणखीन मोठ्या संख्येने जमून अधिक उग्र आंदोलन करणार आहोत, असा इशाराही देवेंद्र तांडेल यांनी यावेळी दिला.


हेही वाचा – अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कात टाकणार; आशियाई फुटबॉल स्पर्धेसाठी सज्जता


 

First Published on: August 25, 2021 11:09 PM
Exit mobile version