पूरग्रस्त व्यापारी, लघुउद्योजकांना केंद्राकडून मिळणार आर्थिक पॅकेज

पूरग्रस्त व्यापारी, लघुउद्योजकांना केंद्राकडून मिळणार आर्थिक पॅकेज

महाराष्ट्रात विशेषत: रायगडच्या महाड तसेच पोलादपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आलेल्या अस्मानी पुरात पुरते नुकसान झालेल्या व्यापारी आणि लघु उद्योजकांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून, यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तयार करण्यास लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाला सांगण्यात आले असल्याची माहिती या खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. स्वत: नारायण राणे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या आठवड्यात वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकार्‍यांनी राणे यांची दिल्लीत भेट घेतली होती. यानंतर मदतीच्या पॅकेजची तयारी सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यात महापुरामुळे नुकसान झालेले व्यापारी व उद्योजक तसेच गेले वर्षभर कोरोनाच्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या राज्यभरातील व्यापार्‍यांसाठी व छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकार तर्फे विशेष आर्थिक पॅकेज देण्याचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे राणे यानी स्पष्ट केले. पुरात झालेल्या व्यापार्‍यांच्या आणि लघुद्योजकांच्या नुकसानीची माहिती चेंबरच्या पदाधिकार्‍यांनी राणे यांना दिली होती. पूरग्रस्त भागातील व्यापार्‍यांना नुकसानभरपाई, तसेच सवलतीच्या व्याजदरात विशेष कर्जपुरवठा यासह कोरोना संबंधीच्या सततच्या निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या राज्यभरातील व्यापारी व उद्योजकांना केंद्र सरकारकडून आर्थिक सहाय्य न मिळाल्यास त्यांना संकटातून बाहेर पडता येणार नाही, असे शिष्टमंडळाने नारायण राणे यांच्या निदर्शनात आणून दिले होते.

एमएसएमईच्या व्याख्येमध्ये समावेश असलेल्या व्यापारी वर्गाला कर्जाच्या वर्गवारीतील सवलतींबरोबरच सरकारी पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियांमध्ये सहभाग आणि उद्योग घटकांना असणार्‍या सवलती व्यापार्‍यांना मिळाव्यात अशा मागण्या शिष्टमंडळाने मंत्री राणे यांच्याकडे केल्या. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार व्यापार्‍यांना आणि लघुउद्योजकांसाठी पॅकेजची तयारी केली जात आहे. अशा व्यापार्‍यांची माहिती जिल्हा प्रशासनांकडून मागवण्यात आल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.

First Published on: August 11, 2021 3:59 AM
Exit mobile version