‘मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट बंद करा’

‘मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट बंद करा’

Cyclone Tauktae: वादळाचे अलर्ट असून NDRF टीम तैनात का नव्हत्या, फडणवीसांचा सवाल

कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४०० झाडे कापावी लागतील, शिवाय ज्या कार डेपोची किंमत ४०० ते ५०० कोटी आहे, त्याची किंमत ४ ते ५ हजार हजार कोटीवर जाणार असल्याने मुंबईकरांना लवकर मेट्रोही मिळणार नाही, वेळेचा अपव्यय होईल. अधिकारी मुख्यमंत्र्यांना भूलथापा देऊन चुकीची माहिती देत आहेत. त्याला मुख्यमंत्री बळी पडत आहेत. आता मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेण्यासाठी सरकारकडे लॉजिकच नाही, त्यामुळे दुसरी कमिटी नेमली आहे. मात्र मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट घालू नये, जे अधिकारी चुकीची माहिती देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, मेट्रो-३ च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार करून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मुंबईकरांना मेट्रो विलंबाने मिळेल. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचा घाट बंद करा, असे म्हणत देवेंद्रे फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष

माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात देखील चर्चा केली. मेट्रो-३ च्या कारशेडची जागा बदलण्याचा घातलेला घाट, आधीच अहवाल लिहून नवीन कमिटीचा निव्वळ फार्स, राज्याचे आर्थिक आणि मुंबईकरांचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी आरे येथेच कारशेड करण्याबाबत तत्काळ पाऊले उचलण्याची गरज आदी मुद्दे मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक विशेष पत्र पाठवले आहे. यामध्ये “मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे ” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आरे कारशेडची क्षमता २०५३ पर्यंत

मुळात मेट्रो-३ च्या कारशेडसाठी आरेचीच जागा सर्वार्थाने योग्य असताना कांजुरमार्गच्या जागेचा आग्रह धरला जात आहे. आता तर काही प्रशासकीय अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. त्यातून राज्याचे प्रचंड आर्थिक नुकसान तर होणारच आहे, शिवाय, मुंबईकरांच्या अतिशय जिव्हाळ्याचा असलेला मेट्रो प्रकल्प लांबणीवर पडणार आहे. मुळात मेट्रोचे कारशेड आरेत करायचे नाही, असा अहवाल लिहून तयार ठेऊन नवीन कमिटीचा फार्स करण्यात येत आहे. असे भासविण्याचा प्रयत्न आहे की, आरे कारशेडची जागा २०३१ पर्यंतच पर्याप्त आहे आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल. मात्र हे धादांत खोटे आहे. मेट्रो-३ ची अंतिम डिझाईन क्षमता ही २०५३ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आली आहे. त्यामुळे २०५३ साली आवश्यक रेल्वेगाड्या मावतील इतकी जागा डेपोमध्ये असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

तसेच, “आरे करशेडसंदर्भात आधीच जागा स्थानांतरणाचा अहवाल तयार केला आहे आणि समिती तसेच कंसलटन्टचा फार्स सुरू आहे. कारडेपो स्थानांतरित केल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे होणारे नुकसान असेल किंवा खासगी व्यक्तींना हजारो कोटींचा फायदा असेल, या सर्व बाबतीत सत्य उघडकीस येईलच आणि त्यावेळी विनाकारण आपल्यावरही संगनमताचा आरोप होईल, म्हणून मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि तत्काळ आरे येथे कार डेपोचे काम सुरू करावे” अशी विनंती देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

First Published on: January 21, 2021 2:26 PM
Exit mobile version