मुलुंडचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

मुलुंडचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे निधन

सरदार तारासिंह

भाजपा नेते आणि महाराष्ट्रातील माजी आमदार सरदार तारासिंह यांचे दुःखद निधन झाले आहे. लिलावती रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटर वरून तारा सिंह यांच्या निधनाची बातमी दिली आहे. ‘माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारासिंग, आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.’ असे ट्विट करत किरीट सोमय्या यांनी ही माहिती दिली.

सरदार तारासिंह हे महाराष्ट्राचे माजी आमदार होते. मुंबईतील मुलुंड विधानसभा मतदार संघाचे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्त्व केले होते. २०१८ साली त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देखील दिला होता.

एक सच्चा समाजसेवक हरपला

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंग यांच्या निधनाने जनसामान्यांचा नेता, एक सच्चा समाजसेवक हरपला आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या ४० वर्षाच्या प्रदीर्घ कार्यकाळात अतिशय प्रामाणिक आणि निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यामुळेच कार्यसम्राट ही उपाधी जनतेने त्यांना बहाल केली होती, त्यांचे निधन संपूर्ण भाजपा परिवारासाठी धक्कादायक आहे, अशा शोकसंवेदना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

First Published on: September 2, 2020 12:55 PM
Exit mobile version