विक्रोळीत चार मित्रांचा मृत्यू

विक्रोळीत चार मित्रांचा मृत्यू

Vikroli

खड्ड्यात अडकलेला धान्याचा ट्रक बाहेर काढताना झालेल्या दुघर्टनेत ट्रक उलटून चार जण जागीच ठार झाले आहे. ही दुर्घटना विक्रोळी पश्चिम येथील सूर्य नगर येथील अहिल्याबाई होळकर चौक, शिवसेना शाखेजवळ गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत ठार झालेल्या चार जणांपैकी एक जण युवासेना शाखाध्यक्ष आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पार्कसाईड पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ट्रकखाली गाडल्या गेलेल्या चारही जणांना बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासून चौघांना मृत घोषित केले. दुघर्टनेत मृत पावणारे चौघेही सूर्यनगर परिसरात राहणारे असल्यामुळे संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होते. पार्कसाइड पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक आणि मनपा कंत्राटदार यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला अटक केली आहे.

अश्विन हेबारे (३५), विशाल शेलार (२५) ,चंद्रशेखर मुसळे (३०) आणि हमीद अब्दुल शेख (३२) असे या दुर्घटनेत मृत झालेल्या चौघांची नावे आहेत. चौघेही सूर्यनगर येथील अहिल्याबाई होळकर चौक येथील चाळीमध्ये राहण्यास होते. अश्विन हा युवासेनेचा शाखाध्यक्ष होता. गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास हे चौघे जेवण झाल्यानंतर शिवसेना शाखा येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आले होते. त्या दरम्यान धान्याने भरलेला ट्रक (एमएच-०४ जीसी- ४६२५) हा सूर्यनगरच्या दिशेने किरणा दुकानात पोते खाली करण्यास जात होता. नुकतेच नाल्याच्या चेंबरचे बांधकाम करण्यात आल्यामुळे अश्विन हेबारे यांनी ट्रक चालकाला ट्रक पुढे घेऊन जाण्यास मनाई केली होती. मात्र ट्रक चालकाने त्याकडे दुर्लक्ष करून ट्रक तसाच पुढे नेला.

चाक खड्ड्यात अडकले

ट्रकच्या वजनाने मागचे चाक नुकतेच बांधकाम झालेल्या नाल्याच्या चेंबरमध्ये अडकून त्या ठिकाणी मोठा खड्डा झाला. चालकाने खड्ड्यात अडकलेले चाक काढण्याचा प्रयत्न केला असता ट्रक डाव्या बाजूने उलटून त्या खाली अश्विन हेबारे, विशाल शेलार ,चंद्रशेखर मुसळे आणि हमीद अब्दुल शेख हे चोघेही गाडले गेले. ट्रक उलटताच त्या ठिकाणी राहणार्‍या स्थानिकांनी दुर्घटनास्थळी धाव घेतली.

ट्रक चालक ताब्यात

घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पार्कसाइड पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ट्रक खाली गाडल्या गेलेल्या चौघांना स्थनिकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तासून मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणी ट्रक चालक जाधव याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. या दुर्घटनेचे वृत्त वार्‍यासारखे संपूर्ण पार्कसाइड आणि सूर्यनगर येथे पोहचताच हजारोंच्या संख्येने नागरिक दुर्घटनास्थळी गोळा झाले. नाल्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करीत कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पार्कसाईड पोलिसांनी स्थनिक नागरिकांची समजूत काढून त्यांना शांत केले.

खड्ड्याची महापालिकेकडे केली होती तक्रार

या खड्ड्या संदर्भात स्थानिक समाजसेवक सुरेश गुप्ता यांनी काही महिन्यापूर्वी मनपाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच स्थानिक नागरिकांपैकी एकाने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडल वर देखील तक्रार करण्यात आली होती, मुंबई पोलिसांकडून सदर तक्रार महानगरपालिकेला पाठवण्यात आल्याचे कळवण्यात आले होते. त्यानंतर या खड्ड्याचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाची रेती -सिमेंट वापरल्यामुळे पुन्हा खड्डे तयार झाले होते अशी माहिती स्थानिक समाजसेवक सुरेश गुप्ता यांनी आपलं महानगरशी बोलता दिली.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल

या दुर्घटनेप्रकरणी पार्क साईड पोलिसांनी ट्रक चालक आणि मनपा कंत्राटदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक जाधव याला अटक करण्यात आल्याची माहिती पार्कसाइड पोलिसांनी दिली आहे.या चेंंबरबाबत महापालिकेच्या एस विभागाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी पर्जन्य जलविभागाला याची कल्पना दिली. त्यानुसार १० एप्रिल रोजी पर्जन्य जलविभागामार्फत या चेंबरचे काम करण्यात आले होते,असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 20, 2019 5:54 AM
Exit mobile version