मुंबईतील गणेशोत्सव शिस्तबद्ध, पर्यावरण पूरक व अभिमानास्पद – अश्विनी भिडे

मुंबईतील गणेशोत्सव शिस्तबद्ध, पर्यावरण पूरक व अभिमानास्पद – अश्विनी भिडे

मुंबई: मुंबईत दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये दरवर्षी साजरा होणारा सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव हा शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि अभिमानास्पद असतो, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.

मुंबईत ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक व शिस्तबद्ध गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, या गणेशोत्सवात सामाजिक संदेश जनतेला मिळावा व त्यातून जनजागृती व्हावी यासाठी मुंबई महापालिका पारितोषिके घोषित करते. यंदाचा गणेशोत्सव पार पडल्यानंतर आज दोन – अडीच महिन्यांनी या गणेशोत्सवात पालिका जनसंपर्क खात्याद्वारे आयोजित स्पर्धेत विजेत्या गणेशोत्सव मंडळांना मंगळवारी पालिका मुख्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. याप्रसंगी परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड, बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर यांच्‍यासह स्पर्धेचे परीक्षक, सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिमंडळ २ चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र काळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांनी केले. यावेळी, बृहन्‍मुंबई सार्वजन‍िक गणेशोत्‍सव समन्‍वय समितीचे अध्‍यक्ष ऍड. नरेश दहिबांवकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना, मुंबई महापालिकेद्वारे गणेशोत्सवात देण्यात येणा-या नियोजनाचे व सेवा-सुविधांविषयक अंमलबजावणीचे कौतुक केले.

गणेशोत्सव स्पर्धेत विजेत्या मंडळांना पारितोषिके

– पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने प्रथम क्रमांक मिळवित, पालिकेचे ७५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

– मालवणी, मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने ५० हजार रुपयांचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

– अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळा ने तिसऱ्या क्रमांकाचे ३५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

– विक्रोळी येथील बालमित्र कला मंडळाने सर्वोत्कृष्ट मूर्तीसाठीचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

– घाटकोपर येथील रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने सर्वोत्कृष्ट नेपथ्यसाठी २० हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.

– कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्तीसाठीचे २५ हजार रुपयांचे पारितोषिक जिंकले.


हे ही वाचा –  संघ व भाजपा आदिवासींना ‘आदिवासी’ मानत नाहीत, राहुल गांधी यांची टीका

First Published on: November 15, 2022 8:36 PM
Exit mobile version