घरमहाराष्ट्रनागपूरसंघ व भाजपा आदिवासींना 'आदिवासी' मानत नाहीत, राहुल गांधी यांची टीका

संघ व भाजपा आदिवासींना ‘आदिवासी’ मानत नाहीत, राहुल गांधी यांची टीका

Subscribe

वाशिम : देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा तुम्हाला आदिवासी मानत नाही; वनवासी म्हणते. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर हे आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत, अशी टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज केली. काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कट्टीबद्ध आहे, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

भारत जोडो यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी सध्या महाराष्ट्रदौऱ्यावर आहेत. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या 24व्या वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे, पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मूळ निवासी व मालक आहेत, असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

- Advertisement -

काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी विविध निर्णय घेतले. भाजपा संविधानच मानत नाही, त्यामुळे आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपाची भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

भगवान बिरसा मुंडा हे जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात लढले आणि आज आपल्याला जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात लढायचे आहे. वनवासी म्हणून भाजपा आदिवासी बांधवांचा अपमान करत आहे. आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते, त्यासाठी काँग्रेसचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत. देशाचे संविधान, तिरंगा सहीसलामत रहावा यासाठीच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय आदिवासी विभागाचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, खा. बाळू धानोरकर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव सहप्रभारी आशिष दुआ व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -