४८ तासात जीत वडिलांच्या ताब्यात

४८ तासात जीत वडिलांच्या ताब्यात

जीत मोहंतोला

कोलकात्याहून रविवारी संध्याकाळी बेपत्ता झालेल्या १५ वर्षांच्या जीत मोहंतोला शोधण्यात मुंबईतल्या घाटकोपर रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी ४८ तासात जीतला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले. २८ सप्टेंबरला सकाळी ८ च्या दरम्यान १५ वर्षांचा जीत घाटकोपर रेल्वे स्टेशनवर उतरला, मात्र तो इथे कसा पोचला, हे त्यालाच कळत नव्हते. घाटकोपर जीआरपी पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कोलकात्यामधून बेपत्ता झालेला जीत मोहंतो पुन्हा आपल्या घरी परतत आहे. मूळचा कोलकात्यामधील मुकुंदापूरमध्ये राहणारा जीत २६ तारखेला संध्याकाळी ट्युशन क्लासला जातो म्हणून घरातून सायकलने बाहेर पडला. घरापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर तीन तरुणांनी जीतचे अपहरण केले.

पुढे काय झाले हे ना जीतला ठावूक ना त्याच्या पालकांना. २८ तारखेला सकाळी ८ च्या दरम्यान घाटकोपर रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये झोपेतून जागा झालेला जीत तिथे उतरला खरा. पण त्यालाच कळले नाही आपण कुठे आहोत ते. बावरलेल्या जीतला घाटकोपर जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना अपहरणाचे वास्तव कळले आणि लागलीच त्याच्या घरी संपर्क साधला. तेव्हा जीत हरवल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ४८ तासात जीत पुन्हा आपल्या पालकांकडे स्वाधीन झाला.
कोलकात्यामधील मुकुंदापूर परिसरात जीत आपल्या आईवडिलांसोबत राहतो. रविवारी संध्याकाळी जीत घरी न परतल्याने त्याच्या आईवडिलांनी लगेचच पोलिसात तक्रार केली. तक्रार आल्यापासून कोलकाता पोलीस जीतच्या शोधात होते. कोलकाता पोलिसांच्या तपासादरम्यान जीत मुंबईकडे येणार्‍या ‘आसनसोल’ एक्सप्रेसमधून आल्याचे समोर आले.

कोलकाता पोलिसांनी मुंबई रेल्वे स्थानकावर असलेल्या पोलीस ठाण्यात ही माहिती दिली आणि जीतचे फोटो पाठवून १८ वर्षांचा मुलगा मुंबईच्या रेल्वे स्थानकात उतरण्याची शक्यता आहे, अशी माहिती दिली. घाटकोपर जीआरपी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सचिन अहिरे आणि कमलेश शर्मा हे राउंडवर असताना त्यांना जीत दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता घडलेल्या सगळ्या प्रकारची माहिती जीतने पोलिसांना दिली.  ८वीच्या वर्गात शिकणार्‍या १५ वर्षीय जीतला उत्तम लिहिता वाचता येते. कोलकातामधल्या पब्लिक स्कूलमध्ये तो शिकतो. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्याने अगदी व्यवस्थितरीत्या दिली म्हणूनच त्याच्या घरच्यांशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. जीत आहे, हे लक्षात आल्यावर घरच्यांना आकाश ठेंगणे झाले, घाटकोपर जीआरपी पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल गोरख गायकवाड यांनी सांगितले.

कारणांचा शोध घेणार
मुलांना एखाद्या गोष्टीत स्वातंत्र्य न मिळाल्यास बर्‍याच वेळा मुले घर सोडतात.जीतच्या बाबतीत असे काही घडले आहे का, तेही पोलिसांकडून तपासण्यात येणार आहे. जीतने सांगितलेले खरे की आणखी काही यामागे आहे, त्याचा शोध पोलीस घेणार आहेत.

पोलिसांचे कौतुक
घाटकोपर जीआरपी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांनी जीतच्या आईवडिलांना संपर्क करताच ते मुंबईत आले. बेपत्ता जीतला अवघ्या ४८ तासांच्या कालावधीत शोधून त्याची सुखरूप त्याच्या वडिलांकडे रवानगी केल्यामुळे घाटकोपर पोलिसांचे कौतुक होत आहे.

First Published on: August 29, 2018 5:00 AM
Exit mobile version