Matrimonial Fraud: सुंदर फोटो दाखवून तरुणीने घातला २३ लाखांचा गंडा

Matrimonial Fraud: सुंदर फोटो दाखवून तरुणीने घातला २३ लाखांचा गंडा

लग्नाच्या वेबसाईटवरून घातला गंडा

मॅट्रिमोनियल वेबसाईटवर स्वत:चे खोटे नाव आणि ओळख देऊन एका तरुणाला सुमारे २३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार पवई परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच वॉण्टेड असलेल्या एका ३२ वर्षांच्या तरुणीला शुक्रवारी पवई पोलिसांनी अटक केली. शुभदा शंकरदयाल शुक्ला ऊर्फ राधिका दिक्षीत असे या तरुणीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यात ती सध्या पोलीस कोठडीत आहेत.

तक्रारदार तरुण पवईतील इक्सेल टॉवर इमारतीमध्ये राहतो. तो मूळचा उत्तर प्रदेशच्या रायबरेली, लालगंजचा रहिवाशी असून गेल्या तीन वर्षांपासून नोकरीनिमित्त काही मित्रांसोबत एकाच फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत आहे. सध्या तो क्रेडिट स्विस शाखेत वरीष्ठ पदावर कार्यरत आहे. चार वर्षांपूर्वी त्याने जीवनसाथी डॉट कॉमवर लग्न जुळविण्यासाठी त्याचा स्वत:चा बायोडाटा टाकला होता. ऑगस्ट २०१७ रोजी त्याने राधिका दिक्षीत नावाच्या दिसण्यास सुंदर असलेल्या मुलीची माहिती वेबसाईटवरून मिळवली. राधिका ही दिसायला खूपच सुंदर असल्याने त्याने तिला एक मेसेज पाठवून तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर या दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले. त्यानंतर ते दोघेही मोबाईलवर एकमेकांच्या संपर्कात होते, यावेळी राधिकाने ती बदलापूर येथे राहत असून मॅक्स न्यूयॉर्क या कंपनीत एचआर म्हणून काम करते, असे सांगितले. दरम्यान तरुणाने तिला भेटण्यास बोलविले होते, मात्र ती भेटायचे टाळत होती.

आयफोनपासून लुटायला सुरुवात

२० ऑगस्टला तिचा वाढदिवस असल्याने त्याने तिला एक आयफोन गिफ्ट द्यावा, असे सांगितले. त्यामुळे त्याने तिच्यासाठी ५० हजार रुपयांचा एक आयफोन घेतला. मात्र वाढदिवसाच्या दिवशी तिने तिचे वडिल रुग्णालयात अ‍ॅडमिट असून त्यांच्या उपचारासाठी प्रचंड खर्च येणार आहे, तिचा भाऊ लंडन येथे असून त्याला पैसे पाठविण्यास उशीर होईल. त्यामुळे त्याने तिला मदत करावी. ही रक्कम ती त्याला नंतर देईल, असे सांगितले. वडिलांसह इतर विविध कारणे सांगून तिने त्याच्याकडून काही महिन्यांत बावीस लाख पाच हजार रुपये ऑनलाईन बँकिंगद्वारे घेतले. तर ५० हजार रुपयांचा आयफोन, ८९ हजार रुपये रोख असे एकूण २३ लाख ४४ हजार रुपये त्याच्याकडून उकळले. मात्र भेटण्यास बोलाविले की ती त्याला सतत टाळत होती. जानेवारी २०१८ रोजी तिने तिच्या वडिलांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगताच त्याने लग्नाची बोलणी सुरु केली. लग्नाच्या बोलणीसाठी त्याने तिला भेटायला बोलाविले, मात्र तिने पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याला भेटण्यास नकार दिला. त्यामुळे तो प्रचंड संतपाला.

भेटली तेव्हा रंगाचा बेरंग झाला

अखेर ८ फेब्रुवारी २०१८ रोजी ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घराजवळ आली. एका कारमधून एक जाडसर मुलगी बाहेर आली आणि तिने ती राधिका दिक्षीत असल्याचे सांगितले. तिला पाहून त्याला धक्काच बसला. तिच्या प्रोफाईलमध्ये असलेली मुलगी आणि प्रत्यक्षात आलेली मुलगी या वेगळ्या होत्या. सुरुवातीला त्याला ती त्याची चेष्टा करीत असल्याचे वाटले, मात्र नंतर तिने लग्नासाठी तिनेच दुसर्‍याच सुंदर दिसणार्‍या मुलीचा फोटो अपलोड केल्याचे सांगून त्याच्याशी खोटे बोलल्याचे सांगितले. चौकशीनंतर तिचे खरे नाव शुभदा शुक्ला असल्याचे उघडकीस आले. नंतर तिने त्याची माफी मागितली, खोटे नाव आणि ओळख सांगून तिने त्याच्याकडून २३ लाख ४४ हजार रुपये घेतले होते. तिने ते सर्व पैसे आणि मोबाईल चार ते पाच दिवसांत देण्याचे मान्य केले. मात्र दिड वर्ष उलटूनही तिने पैसे परत केले नाही. उलट पैशांसाठी तगादा लावल्यास त्याला खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी दिली होती.

चोर तर चोर वरून शिरजोर

या धमकीनंतर सौरभ कुमारने पवई पोलिसांत धाव घेऊन तिथे राधिकाविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित तरुणीविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. याच गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या राधिका ऊर्फ शुभदा शुक्ला हिला शुक्रवारी पवई पोलिसांनी अटक केली. ती सध्या पोलीस कोठडीत असून तिने अशाच प्रकारे इतर काही तरुणांची फसवणुक केली आहे का? याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

First Published on: May 3, 2019 9:16 PM
Exit mobile version