‘इमारतींना खोल्यांच्या संख्येनुसार वाहन पार्किंगला जागा द्या’

‘इमारतींना खोल्यांच्या संख्येनुसार वाहन पार्किंगला जागा द्या’

पार्किंग प्रातिनिधिक फोटो

नवीन इमारतींच्या बांधकामाला परवानगी देताना सदनिकेतील प्रत्येक खोलीप्रमाणे वाहनपार्किंगसाठी जागा उपलब्ध करावी, पालिकेच्या मूळ आराखड्यात तसे बदल असावेत, याबाबत धोरण महापालिकेने ठरवावे आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पनवेल संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली.
महापालिका क्षेत्रात नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना इमारतीत जितक्या सदनिका असतील आणि त्यातील खोल्या, त्या प्रत्येक खोलीप्रमाणे वाहनतळासाठी पुरेशी जागा त्या इमारतीमध्ये असावी, तसे धोरण महापालिकेने राबवून अंमलबजावणी करावी, त्यामुळे रस्त्यावर वाहने लावण्याची वेळ रहिवाशांवर येणार नाही आणि रस्त्यावर वाहतुकीची कोंडीही होणार नाही, असे संघर्ष समितीचे म्हणणे आहे.

इमारतीमध्ये टू रूम किचन असेल तर दोन पार्किंग किंवा फोर रूम असेल तर चार अशी पार्किंगची व्यवस्था त्या इमारतीच्या मूळ आराखड्यात समाविष्ट असली पाहिजे. याबाबत महापालिकेने ठोस धोरण ठरवून त्याची अंमलबजावणी केली तर महापालिका रोल मॉडेल’ ठरू शकते असा दावा कांतीलाल कडू यांनी देशमुख यांच्याशी बोलताना केला.
पनवेल शहराच्याबाबतीत वाहतूक खात्याच्या अधिसूचना कागदावर राहिल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने संबंधित खात्यासोबत बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी विनंती कडू यांनी केली. या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, सचिव चंद्रकांत शिर्के, मंगल भारवड, रवींद्र गायकवाड, अमिता चौहान, मंगला ठाकूर आदींचा समावेश होता.

वीज वाहिन्या तत्काळ बदण्याची गरज

पनवेल शहरातील विद्युत वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत, त्या तत्काळ बदलणे गरजेचे आहे. महावितरणने त्या संदर्भात निविदा काढून ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र, महापालिकेने अव्वाच्या सव्वा दर लावल्याने ते काम सुरू होऊ शकलेले नाही. वास्तविक नवी मुंबई महापालिका 2 हजार 200 रुपये दर आकारत असताना पनवेल महापालिका चक्क नऊ हजार रुपये दर आकारणार असल्याने ते काम राखडले आहे. हा प्रश्न सोडवून वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा सुरळीत राहण्याकरता पनवेलकरांना मदत करावी, अशी मागणीही समितीने केली.

पावसाळा जवळ आल्याने रस्ते खोदण्यास पुढील तीन महिने परवानगी देता येत नाही. महावितरणने स्वः खर्चाने ते काम केले. तर जादा वाटणाèया दराची महापालिकेतील दराशी सांगड घालून असे दर कमी करून दिले जातीत. तर भूमिगत विद्युतवाहिन्यांचे काम करण्याविषयी महापालिका सकारात्मक आहे.

प्रत्येक सदनिका किंवा त्यातील खोल्यांप्रमाणे वाहन पार्किंगचे धोरण महापालिकेला ठरविता येऊ शकते. तसे केल्याने शहरातील रस्ते मोकळे श्वास घेतील आणि सर्वांचीच कोंडी टळेल. हा मुद्दा अतिशय स्वागतार्ह आहे. शहरात वाहनतळ उभे करण्यासाठी बाळाजी ट्रस्ट आणि इतर जागांबाबत आढावा घेतला जाईल.
– गणेश देशमुख, महापालिका आयुक्त, पनवेल

First Published on: May 17, 2018 8:49 AM
Exit mobile version