मुंबई ठाण्यात धुमाकूळ घालणारा सोनसाखळी चोर बडा साजिदला ठाण्यात अटक

मुंबई ठाण्यात धुमाकूळ घालणारा सोनसाखळी चोर बडा साजिदला ठाण्यात अटक

बोगस डॉक्टर स्वप्ना पाटकरला अटक

मुंबईसह ठाण्यात धुमाकूळ घालणारा सोनसाखळी चोर बडा साजिदला वर्तक नगर पोलिसांनी पाठलाग करून ठाण्यातील तीन हात नाक येथून अटक करण्यात आली आहे. कासारवडली, चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करून वर्तक नगर पोलिसांच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचा प्रयत्न करीत असताना त्याला अटक कऱण्यात आलेली असून वर्तक नगर पोलिसांनी त्याचा ताबा चितळासर पोलिसांकडे सोपवला आहे. बडा साजिद याच्यावर ६० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असून कोरोनाच्या काळात नुकताच तो तुरुंगातून जामिनावर बाहेर आला होता.

लॉकडाउनमध्ये ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्यामुळे ठाणे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. या दरम्यान ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरांना अटक कऱण्यात अटक करण्यासाठी अनेक ठिकाणी सापळे रचून देखील हे सोनसाखळी चोर ठाणे पोलिसांना चकवा देऊन पळ काढत होते. ७ ऑगस्ट रोजी वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या आदेशावरुन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद शहा यांच्या पथकातील पोलीस अंमलदार अभिजित सावंत आणि महेंद्र दरेकर हे रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना नीलकंठ हाईट्स या इमारतीजवळ एका मोटारसायकलवर दोन जण संशयितरित्या उभे असल्याचे सावंत आणि दरेकर यांच्या लक्षात आले.

दरेकर आणि सावंत हे यांनी आपली मोटारसायकल त्याच्याजवळ घेऊन जाताच या संशयितांनी तेथून पळ काढला. सावंत दरेकर यांनी या दोघांचा तीन हात नाकापर्यंत पाठलाग करून मोटारसायकलवर मागे बसलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले मात्र त्याचा दुसरा साथीदार पोलिसांच्या तावडीतून निसटला.

बडा साजिद हा सराईत सोनसाखळी चोर असून त्याच्यावर अवघ्या मुंबई ठाण्यात ६० पेक्षा अधिक सोनसाखळीचे गुन्हे दाखल असून त्याला मोक्का देखील लावण्यात आला होता. आमच्या पोलीस ठाण्यातील सपोनि.जावेद शहा यांच्या पथकाने बडा साजिदला अटक करून त्याचा ताबा चितळ्सर पोलिसांकडे देण्यात आला आहे.

– संजय गायकवाड, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वपोनि

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन वर्तक नगर पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता तो सराईत सोनसाखळी चोर बडा साजिद निघाला. ताब्यात घेण्यात आलेल्या बडा साजिद आणि त्याच्या साथीदार या दोघांनी कासारवडवली आणि चितळासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच सोनसाखळी चोरी करून वर्तक नगरच्या हद्दीत चोरीचा प्रयत्न करीत होते अशी माहिती तपासात समोर आली. वर्तक नगर पोलिसांनी बडा साजिद याचा ताबा चितळासर पोलिसांकडे सोपवला असून चितळासर पोलिसांनी बंद साजिदला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा कसून शोध घेण्यात येत आहे.

कोण आहे हा बडा साजिद

मुंबई धारावी येथील चमडा बाजार येथे राहणारा साजिद अब्दुल अजीज शेख उर्फ बडा साजिद (३७) हा सराईत सोनसाखळी चोर असून एकट्या मुंबईत त्याच्यावर ६० पेक्षा अधिक सोनसाखळीचे गुन्हे दाखल आहे. २०१४ मध्ये मुंबई पोलिसांनी त्याच्यावर मोक्का अतंर्गत कारवाई केली होती. जामिनावर बाहेर पडताच त्याने पुन्हा मुंबई, ठाणे आणि नवीमुंबईत सोनसाखळी चोरी करून धुमकाळ घेतला होता. २०१८ मध्ये बडा साजिदला माहीम पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

कोरोनाच्या काळात बडा साजिदची न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. तुरुंगातून बाहेर पडताच बडा साजिदने एका साथीदाराला सोबत घेऊन बोरिवली, दहिसर, मालाड परिसरात ७ सोनसाखळीचे गुन्हे केले. मुंबई पोलीस मागे लागताच बडा साजिद ठाण्यात दाखल झाला आणि त्याने ठाणे शहरात सोनसाखळी चोरीचा सपाटा लावून ठाण्यात धुमाकूळ घेतला होता.


First Published on: August 11, 2020 7:33 PM
Exit mobile version