चांदणीच्या मृत्यूचे गूढ !

चांदणीच्या मृत्यूचे गूढ !

गोवंडीतील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चांदणी शेख हिची जानेवारीत वैद्यकीय चाचणी झाली होती. त्यावेळी तिला कोणत्याही प्रकारच्या गंभीर आजाराचे निदान झाले नव्हते. चांदणीच्या कानातून पू येत होता आणि तिला डोळ्याचा नंबर आहे, असे आढळले होते, अशी माहिती शाळा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे चांदणीचा मृत्यू नेमका का झाला? यावरुन साशंकता व्यक्त केली जात आहे. तसेच चांदणीला दिलेल्या औषधामुळे तिचा मृत्यू झाला नाही, असा दावा मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फेही करण्यात आला आहे.

गोवंडी परिसरात संजय नगर परिसरात राहणार्‍या चांदणीचा सोमवारी मृत्यू झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शाळा प्रशासनाने दिलेल्या गोळीमुळे हा प्रकार घडल्याचे मेसेज आगीसारखे पसरल्याने अशरक्ष: गोंधळ उडला. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने या गोळीमुळे चांदणीचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, यासंदर्भात शाळा प्रशासनाची संपर्क साधला असता शाळेच्या मुख्याध्यापिका सय्यद फराह बानू यांनी सांगितले की, या मुलीसह आम्ही इतरांना सोमवारी ६ ऑगस्ट रोजी ही गोळी दिली होती. त्यानंतर दोन दिवस ती मुलगी शाळेत आली नव्हती. बुधवारी आणि गुरुवारी ती शाळेत आली होती. त्यानंतर आजही ती शाळेत आलेली नाही. आज त्या मुलीला आम्ही कोणतीही गोळी दिली नाही. आज कोणत्याही विद्यार्थ्याला आम्ही आमच्या शाळेत औषध दिलेले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, या औषध देण्याच्या प्रकरणाबाबत बोलताना वैद्यकीय अधिकारी ज्योत्स्ना गुरव म्हणाल्या की, राज्य सरकारच्या योजनेनुसार ही औषध दिले जात आहे. नॅशनल आयरन प्लस इनेशेटिव्ह अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. राज्यभरात ही योजना सुरू असून या अगोदरही या विद्यार्थीनीसह इतर सर्व विद्यार्थ्यांना जुलै महिन्यांपासून हे औषध दिले जात आहे. त्यावेळी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. शुक्रवारी राष्ट्रीय जंत दिवसाच्या निमित्ताने जंताची गोळी दिली जाणार होती. मात्र ती या शाळेत दिलेली नाही. आजही विद्यार्थीनी शाळेत ही आलेली नव्हती. त्यामुळे हा प्रकार नेमका का घडला याची योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. तर पालिकेतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येते. त्यानुसार चांदणीची देखील चाचणी जानेवारीमध्ये करण्यात आली असून त्यावेळी तिला कोणतीही गंभीर आजार नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी फक्त तिला चष्मा आणि कानातून पू येत असल्याचे समोर आले असल्याचे गुरव यांनी यावेळी नमूद केले. या वैद्यकीय चाचणी विद्यार्थ्यांची पूर्ण चाचणी करण्यात येते. त्याचबरोबर हृदय तपासणी देखील करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

९७५ विद्यार्थ्यांना देण्यात आले होते औषध
संजय नगर महापालिका शाळेत एकूण तीन माध्यमांचे वर्ग भरले जातात. उर्दु माध्यमाच्या शाळेत सुमारे १२८५ विद्यार्थी असून सोमवारी ९७५ विद्यार्थ्यांनी हे औषध देण्यात आले होते.

शिक्षणाधिकार्‍यांनी दिली भेट
दरम्यान, शुक्रवारी घडलेल्या या प्रकारानंतर पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी तातडीने या शाळेला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सोमवारी विद्यार्थ्यांना औषध देण्यात आले होते. त्या औषधाने मृत्यू होईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तिचा मृत्यू का झाला हे सांगता येईल. खबरदारीसाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकांनी गोंधळून न जाण्याचे हे आवाहन त्यांनी यावेळी केले.

First Published on: August 10, 2018 11:30 PM
Exit mobile version