Corona: प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची पालिकेत प्रतिनियुक्ती

Corona: प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची पालिकेत प्रतिनियुक्ती

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आता मुंबई महापालिकेच्यावतीने अनुभवी सनदी अधिकारी (आयएएस) मनिषा म्हैसकर यांना पाचारण करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयातील कोरोना कोविड १९ च्या नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून सनदी अधिकारी अश्विनी भिडे आणि रामास्वामी यांना प्रतिनियुक्तीवर सरकारने पाठवल्यानंतर आता मनिषा म्हैसकर यांचीही मदत घेतली जाणार आहे. मनिषा म्हैसकर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त असताना २०१० मध्ये मुंबईतील मलेरियामुळे निर्माण झालेली भयाण परिस्थिती नियंत्रणात आणण्याची महत्वाची भूमिका त्यांनी बजावली होती. मलेरिया नियंत्रणात आणण्याचा तसेच महापालिकेचा अनुभव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हैसकर यांची नियुक्ती करत त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

मुंबई महापालिकेतील कामाचा अनुभव 

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाचे आता कोरोना नियंत्रण कक्षात रुपांतर झाले आहे. आजवर मुंबईतील २६ जुलैचा महापूर, मंत्रालयातील आग, दहशतवादी हल्ला, राज्यातील पूरपरिस्थिती, मुंबईतील आगीच्या घटनांसह शहरातील सर्व प्रकारच्या तक्रारींचे निरसन करणाऱ्या या अत्याधुनिक नियंत्रण कक्षेतच कोरोनाचा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या तुलनेत मुंबई महापालिकेचा आपत्कालिन नियंत्रण कक्ष सुसज्ज आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असून या ठिकाणी ४८ ऑपरेटर्स कार्यरत आहेत. आपत्कालिन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर आणि उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्षाचे काम चालत असून आजवर सर्व प्रकारच्या आपत्तीच्यावेळी या नियंत्रण कक्षाने महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. आता कोरोनातही हाच नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहे.

याच नियंत्रण कक्षात सरकाने प्रतिनियुक्तीवर बसलेले कोरोना नियंत्रण कक्षाचे समन्वयक अश्विनी भिडे आणि रामास्वामी मुंबईच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच सर्व अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून संबंधितांना सुचनाही करत आहेत. मात्र, भिडे आणि रामास्वामी यांना महापालिकेचा अनुभव नसल्यामुळे त्यांना समन्वय राखण्यात येणाऱ्या अडचणी पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सनदी अधिकारी मनिषा म्हैसकर यांनाही प्रतियुक्तीवर कोरोना नियंत्रण कक्षात समन्वयक म्हणून पाठवले आहे.

कोण आहेत मनिषा म्हैसकर 

मनिषा म्हैसकर या १९९२ च्या बॅचच्या असून सांगलीच्या जिल्हाधिकारी असताना त्यांनी पूरपरिस्थितीवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आरोग्य विभागाची महत्वाची जबाबदारी पार पाडली होती. सन २०१० मध्ये मुंबईमध्ये मलेरियाचा प्रार्दुभाव प्रचंड वाढला होता. त्यावेळी मुंबईमध्ये सुमारे ७५ हजारांहून मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते. तर १४५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मुंबई मलेरियाने फणफणलेली असतानाही मनिषा म्हैसकर यांनी पुढे परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम केले होते. मलेरियाच्या आजाराचा दांडगा अनुभव म्हैसकर यांच्याकडे असून आरोग्य विभागाची खडानखडा माहिती त्यांना आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुठे आणि कसे काम करायचे याचे ज्ञान असल्यामुळे त्यांचा हा अनुभव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मनिषा म्हैसकर यांची बुधवारी प्रतिनियुक्ती करून मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांवर विशेष लक्ष आणि उपाययोजना करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा –

Coronavirus: कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना हवंय ‘आईचं दूध’

First Published on: April 10, 2020 3:22 PM
Exit mobile version