नीरव मोदी प्रकरणात मुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी

नीरव मोदी प्रकरणात मुंबई ईडी प्रमुखांची पदावरुन हकालपट्टी

सरकारने ईडीचे मुंबई विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. विनीत अग्रवाल यांनी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य प्रक्रियेचे पालन न करता कार्यमुक्त केले होते. विनीत अग्रवाल यांच्या या निर्णयामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसंच विनीत अग्रवाल यांचा कार्यकाल तीन वर्षांनी कमी करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंत्रिमंडळाने नियुक्त केलेल्या समितीने मंजूरी दिल्यानंतर मंगळवारी हे आदेश जारी केले. त्यानंतर ईडीने अग्रवाल यांची विशेष संचालक पदावरुन हकालपट्टी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या विनीत अग्रवाल यांना सध्या गृह विभागात पाठवण्यात आले आहे. मुंबईतील ईडीचा विशेष संचालक हा पश्चिम विभागाचा प्रमुख असतो. महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर त्यांचे नियंत्रण असते.

आता मुंबईच्या संचालकांचा कारभार चेन्नईतील विशेष संचालकांना सुपूर्द करण्यात आला आहे. विनित अग्रवाल यांना २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले होते. विनित अग्रवाल यांचे नाव तेव्हा चर्चत होते जेव्हा २९ मार्च रोजी संयुक्त संचालक सत्यव्रत कुमार यांना नीरव मोदी चौकशी प्रकरणातून हटवण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, नीरव मोदीला स्कॉटलँड यार्डने लंडनमधील एका बँक शाखेतून अटक केली होती. नीरव मोदी या बँकेत नविन खाते सुरु करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

First Published on: April 17, 2019 12:28 PM
Exit mobile version