आयटीआय शिक्षकांना मोठा दिलासा, मानधनात वाढ

आयटीआय शिक्षकांना मोठा दिलासा, मानधनात वाढ

महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील आय टी आय मध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्याच्या दृष्टीने तसेच तेथील प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी तासिका तत्वावर प्रशिक्षित व अनुभवी निदेशक उपलब्ध करून दिले जातात. त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिकेसाठी निदेशकांस पूर्वी प्रत्येकी ७२ रु. व ३६ रु. दिले जात होते त्यात भरगोस वाढ होऊन सैद्धांतिक तासिका मानधन २५० रु. तर प्रात्यक्षिक तासिकेच्या मानधनात १२५ रू. करण्यात आले असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

औद्योगिक क्षेत्रातील जागतिकीकरण विचारात घेता, कुशल मनुष्यबळाची गरज वाढलेली आहे. त्यास अनुसरून औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून शिल्पकारागिर योजनेसोबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. यासाठी तासिका त्वतावर आवश्यक निदेशकांची गरज पाहता पूर्वी मानधन फार कमी होते त्यामुळे उत्तम प्रतीच्या प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षक निदेशक त्वरित उपलब्ध होत नव्हते ही बाबाब लक्षात घेऊन शासनाने ही वाढ केली असून आता तासिका तत्वावर उत्तम प्रशिक्षित निदेशक उपलब्ध होणार आहेत. त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होणार असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दर्जा वाढण्यास याची मदत होईल, असे निलंगेकर म्हणाले.

राज्य सरकारच्या या निर्णयानुसार आद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिका घेण्यासाठी नेमणूक करण्यात येणार्‍या तासिका तत्त्वावरील शिल्प निदेशक, चित्रकला निदेशक, गणित निदेशक, गणित आणि चित्रकला निदेशक यांच्या मानधनात वाढ करण्यात शासन मंजुरी देण्यात आली आहे. तर या संस्थांचा दर्जा वाढविण्यास शासन प्रयत्नशील असून मॉडर्न आयटीआय निर्मिती, वर्चुअल क्लास रूम, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रणाली राबविण्यात येत आहे. भारत सरकारने Make in India व Skill India या प्रमुख योजनांव्दारे सन २०२२ पर्यंत ५० कोटी युवकांना प्रशिक्षित करण्याचे ठरविले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र या धोरणाव्दारे सन २०२२ पर्यंत ४.५ कोटी युवकांना प्रशिक्षित करण्याचे योजिले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

First Published on: November 18, 2018 5:17 AM
Exit mobile version