गरोदर महिलांमध्ये वाढतोय हृदयविकार

गरोदर महिलांमध्ये वाढतोय हृदयविकार

गरोदर महिला

गर्भधारणा झाली की महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि राहणीमानामुळे महिलांच्या हृदयावरही परिणाम होत आहे. सध्या गरोदर महिलांमध्ये ‘ह्र्युमॅटीक मायट्रल स्टेनॉसिस’ म्हणजेच हृदयाचं वॉल्व आकुंचन पावून त्यातून रक्तस्त्राव कमी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. जंतूचा संसर्ग होऊन किंवा स्वच्छता न ठेवल्यामुळे असे विकार हृदयाला जडतात किंवा काही प्रमाणात अनुवंशिकही हा आजार होऊ शकतो.

महिलांच्या हृदयांवर शस्त्रक्रिया 

परळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांत हृदयाची अशा प्रकारची समस्या असणाऱ्या २०० हून अधिक महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गर्भावस्थेत या महिलांच्या हृदयाची झडपं आकुंचन पावते. अशा महिलांच्या हृदयाच्या झडपांची (व्हॉल) ची शस्त्रक्रिया करण्यात आली असून या मातांची प्रकृती आणि त्यांचं बाळ दोघंही सुखरूप आहेत. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांपासून हृदयात होणारे बदल जाणवू लागतात. त्यानुसार नाडीचे ठोके बदलणं, हृदयाकडून रक्त पंप होण्याच्या प्रक्रियेत बदल होणं, ईसीजी काढल्यास त्यामध्ये बदल जाणवणं, हृदयाच्या झडपेचा आजार अशा अनेक समस्या जाणवतात.

ही शस्त्रक्रिया अवघड 

याविषयी ‘माय महानगर’ शी बोलताना केईएम रुग्णालयातील हृदयविकार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी सांगितलं की, “गर्भवती महिलांमध्ये हृदयविकाराची समस्या वाढत आहेत. गेल्या दोन वर्षांत या रुग्णालयात २०० गरोदर महिलांच्या हृदयाच्या झडपांवर (व्हॉल्व) ची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वैद्यकीय भाषेत याला Rheumatic mitral stenosis म्हणजेच हृदयाचं वॉल्व आकुंचन पावणे असं म्हणतात. त्यानंतर हृदयाकडून शरीराला होणारा रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो, त्यामुळे फुफ्फुसावर ताण येतो. त्यामुळे गर्भवतींना श्वास घेण्यास अडचणी येतात आणि दम देखील लागतो. अशा महिलांवर तातडीने हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये दुर्बिण शस्त्रक्रियेद्वारे हृदयाच्या मुख्य धमनीची झडप उघडून बलून टाकून रक्तपुरवठ्याचा मार्ग मोकळा करण्यात येतो. गर्भवती महिलेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणं खूपच अवघड असतं. अशावेळी काही समस्या उद्भवल्यास तातडीने बायपास शस्त्रक्रिया करावी लागते. यामुळे गर्भातील बाळावरही याचा परिणाम होऊ शकतो. पण सध्या या शस्त्रक्रियेमुळे ९० टक्के महिलांची प्रसूती सुखरूप झाली आहे.’’

First Published on: February 25, 2019 8:10 PM
Exit mobile version