Corona: पालिकेच्या कॉलसेंटरद्वारे ६ हजारांहून अधिक व्यक्तींना मार्गदर्शन

Corona: पालिकेच्या कॉलसेंटरद्वारे ६ हजारांहून अधिक व्यक्तींना मार्गदर्शन

मुंबई महानगरपालिका

मुंबईत ‘कोरोना कोविड १९’च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी महापालिकेच्यावतीने प्रयत्न सुरु असून या प्रयत्नांचा भाग म्हणून ज्या व्यक्तींना कफ, सर्दी, खोकला, ताप, श्वास घेताना त्रास होणे अशी लक्षणे जाणवत असतील त्यांना दूरध्वनीद्वारे व घरबसल्या महापालिकेच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन प्राप्त करून घेता यावे, याकरिता ‘कॉल सेंटर’ची सुविधा खुली करण्यात आली आहे. या कॉलसेंटरद्वारे दहा दिवसात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी संपर्क करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे.

महापालिकेतर्फे ‘०२०-४७०-८५-०-८५’ क्रमांकाच़ी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असून सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन नागरिकांना केले जाते. देशातील या पहिल्याच ‘कॉल सेंटर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या दहा दिवसात तब्बल ६ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींनी दूरध्वनी करून तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे. तर यापैकी ३१९ व्यक्तींना ‘कोरोना कोविड १९’ विषयक वैद्यकीय तपासणी करून घेण्यासाठी रेफर’ करण्यात आले आहे. तसेच संबंधितांना त्यांच्या घरी जावून नमुने घेऊन जाणाऱ्या प्रयोगशाळांचे ‘दूरध्वनी क्रमांक’ हे ‘कॉल सेंटर’ द्वारे देण्यात येत आहेत. जेणेकरून संशयितांना त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची आवश्यकता भासणार नाही.

होम क्वारंटाईन व्यक्तींचा ‘कॉल सेंटर’ द्वारे पाठपुरावा

मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तींपैकी १ हजार २२४ व्यक्तींना घरच्या घरीच होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच बाधा झालेल्या व्यक्तींना तात्काळ रुग्णालयात दाखल करून आवश्यक ते औषधोपचार सुरू करण्यात आले. या ‘कॉल सेंटर’ला ज्यांनी फोन केले आहेत, त्यांना ‘कॉल सेंटर’द्वारे ‘फोन’ करण्यात येत असून त्याद्वारे आवश्यक तो पाठपुरावा देखील नियमितपणे करण्यात येत आहे. त्याचबरोबर घरच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींबाबत देखील ‘कॉल सेंटर’ द्वारे पाठपुरावा करण्यात येत असल्याचेही महापालिकेने सांगितले आहे.

First Published on: April 9, 2020 10:52 PM
Exit mobile version