मृत मनसुख हिरेन यांच्या तोंडात दोन ते तीन रूमाल! 

मृत मनसुख हिरेन यांच्या तोंडात दोन ते तीन रूमाल! 

व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीतील गाळातून बाहेर काढण्यात आला, त्यावेळी मनसुख यांच्या तोंडावर एक मास्क आणि मास्कचा आतमध्ये दोन ते तीन हात रुमाल होते, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास मुंब्रा पोलिसांना एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने मृतदेह खाडीतील गाळातून बाहेर काढला. त्यावेळी मृतदेहाच्या शरीरावर केवळ पॅन्ट होती, अंगावर शर्ट नव्हता. तसेच मृत इसमाच्या तोंडावर एक मास्क होता आणि मास्कच्या आत दोन ते तीन पांढऱ्या रंगाचे हातरुमाल होते. मुंब्रा पोलीस आणि स्थानिकांनी हा सर्व प्रकार मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. मृतदेहाचा पंचनामा करत असताना, तसेच मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु असताना हा सर्व प्रसंग तेथे जमलेल्या अनेकांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.

मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दरम्यान ठाणे चराई येथून गुरुवार रात्रीपासून बेपत्ता असलेले मनसुख हिरेन यांचा शुक्रवारी शोध घेत असताना मुंब्रा पोलिसांना एक अनोळखी मृतदेह मिळून आल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली. मुंब्रा खाडीत मिळून आलेला मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी मिळून आलेल्या मोटारचे मालक मनसुख हिरेन यांचाच असल्याचे कळताच एकच खळबळ उडाली.

आत्महत्या नसून घातपात; कुटुंबाचा आरोप

मनसुख आत्महत्या करूच शकत नाहीत, त्यांचा घातपात झाल्याचा आरोप मनसुख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. रात्री मनसुख यांना एक फोन आला आणि ते घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांचा फोन बंद लागत होता, असे मनसुख यांच्या पत्नीचे म्हणणे आहे. माझे पती हे आत्महत्या करूच शकत नाही, त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसुख यांची पत्नीने केला आहे. माझ्या पतीना मागील आठ दिवसांपासून चौकशीसाठी पोलिसांकडून सतत फोन येत होते आणि ते पती पोलिसांना सहकार्य करत होते. गुरुवारी त्यांना तावडे नावाच्या क्राईम ब्रांच अधिकाऱ्याचा फोन आला होता आणि तावडे यांनी माझ्या पतीला घोडबंदर रोड येथे बोलावून घेतले होते, अशी माहिती मनसुख हिरेन यांच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना दिली.

First Published on: March 5, 2021 10:43 PM
Exit mobile version