कोकनचो राजा दर्यापार हापूसची परदेशवारी सुरू

कोकनचो राजा दर्यापार हापूसची परदेशवारी सुरू

हापूस इलो रे....पण अवकाळी पावसामुळे होतोय हापूसच्या चाहत्यांचा हिरमोड

ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये पडलेला पाऊस आणि त्यानंतर आलेली थंडीची लाट,यामुळे कोकणातील हापूस आंब्याला काहीशा प्रमाणात फटका बसला असून आंब्याचे नुकसानही झाले आहे. मात्र त्याचा विपरित परिणाम आंब्याच्या बाजारावर परिणाम झालेला नसून उलट आवक वाढली आहे. आजमितीस हापूसच्या 1000 पेट्यांची आवक एपीएमसी फळ मार्केट मध्ये होत असल्याने आता या आंब्याची परदेशवारी सुरू झाल्याची माहिती व्यापार्‍यांकडून देण्यात आली. आफ्रिकन हापूस आंब्याच्या तुलनेत कोकणातल्या हापूसने पुन्हा एकदा मजल मारल्याने दरही स्थिर राहिले आहेत. एरव्ही 5 ते 6 हजारात विकला जाणारा आंबा यावेळी वाढती आवक पाहता 2 ते 5 हजारात पेटी विकला जात आहे.

अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे बाजारात येणार्‍या आंब्यामध्ये 10 ते 15 टक्के आंबा नासलेला निघत आहेत. महिनाअखेरपर्यंत आंब्याची अशीच आवक राहणार असून चांगला दर्जेदार हापूस बाजारात येण्यासाठी आंबाप्रेमींना मार्च महिना उजाडण्याची वाट पाहावी लागणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून बाजारात कोकणातील हापूस आंब्याचे आगमन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आंबाप्रेमींसोबत व्यापारीही आंब्याच्या हंगामाची वाट पाहत असतात. यावेळी आंबा बाजारात यायला सुरुवातही झाली, मात्र हवा तसा आंबा अजूनही बाजारात येऊ शकला नाही. या वेळी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आलेला आंब्याचाच मोहोर पाहता यावर्षीचा हापूस आंब्याचा हंगाम चांगला जाईल, अशी अपेक्षा व्यापार्‍यांसोबत आंबा उत्पादक शेतकर्‍यांनाही होती.परंतु बाजारात आलेला 10 ते 15 टक्के आंबा पूर्ण तयार होताना दरम्यानच्या काळात खराब होत आहे. सध्या काही प्रमाणात या आंब्याला थंडीचा फटका बसला असला तरी एकूण आंब्याचे प्रमाण पाहता हा आंबा बर्‍यापैकी मार्चमध्ये बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. मार्चमध्ये येणारा हा आंबा चांगल्या दर्जाचा असेल, अशी अपेक्षा व्यापार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

डिसेंबर महिन्यापासून मार्केटमध्ये आंब्याची आवक सुरू झाली असून त्या वेळी 200 ते 250 पेट्या येत होत्या. हळूहळू त्यात वाढ झाली असता गत महिन्यात 700 हून अधिक पेट्या बाजारात यायला सुरुवात झाली. त्यात वाढ होत आजमितीस 1000 पेट्या बाजारात येत असल्याने 10 ते 15 टक्के आंबा खराब निघत आहे. बाकी इतर आंबा चांगला असल्याने आता तोच आंबा परदेशात पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. मार्च मध्ये अजून आवक वाढणार असल्याने त्यावेळी निर्यातही वाढणार आहे. आता आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात असल्याने तो 2 ते 5 हजारात विकला जात आहे.        संजय पानसरे – व्यापारी, एपीएमसी फळ मार्केट

First Published on: February 15, 2019 4:36 AM
Exit mobile version