अवघ्या ७ धावांत ११ फलंदाज बाद; एकानेही फोडला नाही भोपळा

अवघ्या ७ धावांत ११ फलंदाज बाद; एकानेही फोडला नाही भोपळा

अवघ्या ७ धावांत संपूर्ण संघ गारद; सर्व धावा अवांतर!

हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील (१६ वर्षांखालील) एका सामन्यात अंधेरीच्या चिल्ड्रन वेल्फेअर स्कुलने नकोसा विक्रम आपल्या नावे केला. बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा डाव अवघ्या ७ धावांत आटोपला. त्यांच्या एकाही फलंदाजाला खाते उघडता आले नाही. त्यांच्या सातही धावा अवांतर होत्या. त्यामुळे स्वामी विवेकानंद शाळेने हा सामना तब्बल ७५४ धावांनी जिंकला.

मित मयेकरचे दमदार त्रिशतक 

आझाद मैदान येथे झालेल्या या सामन्यात स्वामी विवेकानंद शाळेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ४५ षटकांत ४ बाद ७६१ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मित मयेकरने अवघ्या १३४ चेंडूत ५६ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ३३८ धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर कृष्णा पार्टे (९५) आणि ईशान रॉय (६७) यांनी चांगली साथ दिली.

चिल्ड्रन वेल्फेअर स्कुलचा ७ धावांत धुव्वा

७६२ धावांच्या अशक्यप्राय वाटणाऱ्या आव्हानाचा पाठलाग करताना चिल्ड्रन वेल्फेअर स्कुलची सुरुवातीपासूनच घसरगुंडी उडाली. त्यांचा डाव ६ षटकांत ७ धावांवर आटोपला. त्यांच्या धावसंख्येतील सर्व धावाअवांतर होत्या.स्वामी विवेकानंद शाळेकडून आलोक पालने भेदक गोलंदाजी करताना ३ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या. २ विकेट्स मिळवणाऱ्या वरद वझेची त्याला उत्तम साथ लाभली, तर इतर दोन फलंदाज धावचीत झाले.

First Published on: November 21, 2019 5:42 PM
Exit mobile version