शरद पवारांचं नाव घेण्याची लायकी आहे का? हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांना सवाल

शरद पवारांचं नाव घेण्याची लायकी आहे का? हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांना सवाल

हसन मुश्रीफ आणि सोमय्या

माझ्यावर आतापर्यंत घोटाळ्याचा एकही आरोप झाला नाही. आरोप करून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण त्यात यश येणार नाही. किरीट सोमय्या माझ्यावर आरोप करताना शरद पवार यांचेही नाव घेत आहेत. यात शरद पवारांचा संबंधच काय? असा सवाल करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पवारांचे नाव घेण्याची तुमची लायकी तरी आहे का? अशा शब्दात सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गडहिंग्लजमधील आप्पासाहेब नलावडे या कारखान्यातही बोगस कंपन्यांद्वारे घोटाळा झाल्याचा नवा आरोप केला. हा करताना सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्या जावयाचेही नाव घेतले . हे आरोप फेटाळून लावताना मुश्रीफ यांनी सोमय्या यांची सीएची पदवी खरी आहे का ते तपासावे लागेल, असा टोला लगावला. आपल्यावरील आरोप बिनबुडाचे असून याप्रकरणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली.

सोमय्या यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्यावर आणखी काही आरोप केले. या आरोपांना मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. सोमय्या हे आपल्यावर आरोप करताना शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव घेत आहेत. हे बोलण्यापासून त्यांना रोखण्यासाठी आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

मला सोमय्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एकदा तक्रार केली आहे. मग त्या तपास यंत्रणा तपास करतील की, तुम्ही कशाला पर्यटन करायला जात आहात? तुरुंगात टाकणार, घोटाळेबाज असे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बेछूट आरोप करणारे सोमय्या हे न्यायाधीश झाले का? असा सवाल करून तुम्हाला आरोप करण्याची सुपारी दिली आहे तर तुम्ही तुमचे काम करा, खुशाल तक्रार करा पण तपास यंत्रणांना तपास करु द्या. तपास होण्याआधी तुम्ही बदनामी का करत आहात? असे मुश्रीफ म्हणाले.


First Published on: September 20, 2021 10:10 PM
Exit mobile version