मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले

गेल्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगर आणि ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. शुक्रवार, रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असून त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य पाहालया मिळत आहे.

मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर रेल्वेच्या वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. मुंबईतील किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा, कुर्ला, चेंबूर या परिसरात पावसाचा जोर वाढला असून बदलापूर-अंबरनाथ येथे पावसाच्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

पावसाचा विमानसेवेवरही परिणाम 

मुंबईत पडणाऱ्या सततच्या पावसामुळे त्याचा परिणाम विमान सेवेवर देखील झाला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवरून जाणाऱ्या ७ फ्लाईट्स रद्द केल्याची माहिती त्यांच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. तर ८ ते ९ विमानांची दिशा खराब हवामानामुळे बदलण्यात आली आहे.

बदलापूर स्थानकात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले 

ठाणे, कल्याण, नवी मुंबई पट्ट्यात शुक्रवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बदलापूर स्थानकाच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. बदलापूर-अंबरनाथ रेल्वे स्थानकात पाणी फलाटापर्यंत पोहोचले. बदलापूर लोकल ही कल्याण स्थानकामध्ये रद्द करण्यात आली असून कर्जतच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे. लोकल आणि रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफचे एक पथक रात्रभर काम करत होते. प्रवाशांना सुखरूप जवळच्या प्लॅटफॉर्मपर्यंत आणण्यात आले. मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुथडीभरून वाहत असल्याने अंबरनाथ-बदलापूर येथे ठिकठिकाणी पाणी साचले.

प्रवाशांना पोलीस आणि एनडीआरएफच्या टीमने केली मदत

सायन परिसरातील रोड क्रमांक ६ वर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. जागोजागी पाणी साचल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांचा निर्णय शाळेवर सोपवला 

शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुट्टी द्यायची की नाही, हा निर्णय त्या त्या शाळा-कॉलेजच्या मुख्याध्यापक आणि प्राध्यापिकांनी घ्यावा, असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

First Published on: July 27, 2019 8:27 AM
Exit mobile version