टोपी संभालो हवा बदल रही है

टोपी संभालो हवा बदल रही है

राज्यासह देशात तिसर्‍या टप्प्यातील मतदान संपले आहे. पहिल्या टप्प्यानंतरच राजकीय आरोप-प्रत्यारोपांची बदललेली दिशा, सभांमधील रिकाम्या खुर्च्या, फसलेले आराखडे यामुळे बदलू पहाणार्‍या राजकीय हवेचा झंंझावात अनुभवास येऊ लागला. त्याप्रमाणे देशातील उद्योजकांकडूनही सत्ता होडीच्या बदलू इच्छिणारी शिडाचा अंदाज बांधून त्यानुसार कृती होऊ लागली. अब्जावधींचा उद्योग चालवयाचा म्हणजे राजकीय बित्तंबातमी उद्योजकांना ठेवावी लागते. मुकेश अंबानी यांनी ही बदलती हवा लक्षात घेऊन यावेळी थेट काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला आहे. सत्ताबदल उद्योजकांना अगोदर कळतो आणि तसा ते संकेत देतात, हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळेच अग्नीपथमधील अमिताभ बच्चनचा ‘दिनकरराव टोपी संभालो, नही तो उड जायेगा’ हा डायलॉग सध्याच्या राजकीय परिस्थितीला तंतोतत जुळतो! सध्या देशात हवा बदलण्याचे वातावरण सुरू असून २३ मेला देशाची हवा कोणत्या दिशेला आहे ते कळेल.

जनता पक्ष सरकार
आणीबाणीनंतर १९७७ साली देशात निवडणुका लागल्या होत्या. जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यावेळी निवडणुकीत काय होणार हे तत्कालीन उद्योगपतींनी ताडले होते. त्यावेळी बिर्ला उद्योगसमुहाशी संबंधित व्यक्तीने मोरारजी देसाई यांची भेट घेतल्याची जोरदार चर्चा होती. या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली देशात जनता पक्षाचे सरकार आले.

Morarji Desai

वाजपेयी सरकार
१९९८ साली देशात भाजपच्या नेतृत्त्वाखालील १३ महिन्यांचे सरकार पडून पुन्हा निवडणुका लागल्या होत्या. देशात कोणते सरकार, याचे आराखडे बांधणे सुरू झाले होते. त्यावेळी धीरुभाई अंबानी यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची भेट घेतली होती. अंबानी-महाजन यांच्या भेटीचे वृत्त त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार स्थापन झाले.

Atal Bihari Vajpayee

अनिल अंबानी सोनियांना भेटले
२००४ साली देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार होते. लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती. इंडिया शायनिंग, फिल गुड अशा कॅम्पेनने देशातील वातावरण भारावून टाकण्यात आले होते. पुन्हा वाजपेयी सरकार येणार असे म्हटले जाऊ लागले. मात्र अनिल अंबानी यांनी बदललेल्या हवेची दिशा ओळखली. १२ मे २००४ रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी अनिल अंबानी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती.

मुकेश अंबानींकडून देवरांचा प्रचार
मुकेश अंबानी हे सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत. ते खूप समजूतदार आहेत, असेही म्हटले जाते. ते सहज कोणाबाबत वक्तव्य करतील, असे होऊ शकत नाही. अंबानी इतके हुषार आहेत की राजकारणातील चढ-उतार त्यांना समजतात. शिवाय ते देशातील एक महत्त्वाचे प्रस्थ आहेत, जे ज्याच्या खांद्यावर हात ठेवतील ती व्यक्ती मोठी होणार. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला दुर्लक्षित करता येणार नाही. ते राजकारणातील डावपेच चांगलेच ओळखतात. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जिंकवून देण्याचे आवाहन करणारा एक व्हिडिओ १८ एप्रिल २०१९ मध्ये जारी केला आहे. मुकेश अंबानी, कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांन सारखे देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती काँग्रेसच्या उमेदवाराला जिंकून देण्याचे आवाहन करतात, तेव्हा ही बाब विचारात घेण्यासारखी आहे.

Mukesh-Ambani

हवेची दिशा ओळखली?
हो, मुकेश अंबानी, अनिल अंबानी या विचारात नक्कीच असतील की मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले नाहीत तर काय होईल. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये अंबानी-अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींबाबत जी भूमिका मांडली आहेत आणि संपूर्ण देशात सर्वसामान्य तसेच गरिब जनतेची जी परिस्थिती झाली आहे, त्यामुळे मुकेश अंबानी यांनीही त्यांची भूमिका देशासमोर आणली आहे. मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना समर्थन देत असा मेसेज पोहोचवला आहे की ते फक्त नरेंद्र मोदींच्याच जवळचे नाहीत. त्यांना काँग्रेसही जवळची आहे. कारण उद्योगपतींना सत्तेत कोणीही असो मधुर संबध ठेवावेच लागतात.

रतन टाटांकडून भेट                                                          मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबईसाठी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांची शिफारस केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशीच सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरला भेट घेतली. एका बाजूला मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करतात. तर रतन टाटा हे दुसर्‍याच दिवशी सरसंघचालकांची भेट घेतात. यात नेमकी काय गोम आहे? पण काही तरी शिजतंय इतकं नक्की.

आम्हाला विसरू नका                                                         आता आम्हीही हाच विचार करतोय की देशाची हवा कोणत्या दिशेने वाहू लागली आहे. जर देशाच्या बदलत्या वातावरणाबाबत सांगायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या एका निवडणूक प्रचारात व्यापारी जगतातील लोकांना संबोधित करताना असे आवाहन केले होते की, व्यापारी हा समजूतदार असतो आणि देशातील वातावरणाचा अंदाज घेतात. त्यामुळे मोदींच्या या वक्तव्याला मुकेश अंबानी यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना जिंकून देण्याच्या वक्तव्याशी का जोडले जाऊ नये.                                                         

दक्षिण मुंबई आणि भोपाळवर सर्वांचे लक्ष                                                                                त्यामुळे मुकेश अंबानी यांचे काँग्रेसच्या एक उमेदवाराबाबत दिलेले सकारात्मक वक्तव्य हे देशातील बदललेल्या हवेचे लक्षण आहे. दुसरीकडे भोपाळमध्ये मोदी-शहा यांचे साध्वी प्रज्ञाला भाजपचा उमेदवार बनवणे या गोष्टीकडे लक्ष वेधते की भोपाळमधील त्यांची जागा धोक्यात आहे. तर मध्य प्रदेश राज्यात त्यांना ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुसलमान हा मुद्दा घेत धर्मयुद्ध बनवण्याची आवश्यकता भासली. त्यामुळे मुंबईतील दक्षिणेची जागा आणि भोपाळची जागा यातून असा अंदाज लावता येतो की मुकेश अंबानी आणि नरेंद्र मोदी हे दोघेही बदललेल्या हवेची दिशा ओळखू लागले आहेत.

आम्हीही सेवेत तप्तर
आपले ते दिवस आजही लक्षात आहेत, जेव्हा व्ही पी सिंह, भूरेलाल पार्टीच्या दहशतीमुळे धीरुभाई यांना झटका लागला होता. तेव्हा अंबानी कुटुंबाने संपूर्ण ताकदीनिशी दिल्लीतील सत्ताधार्‍यांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न केले होते. मुकेश अंबानी यांनी जाणिवपूर्वक मिलिंद देवरा यांच्या माध्यमातून राहुल गांधींपर्यंत हा मेसेज पोहोचवला आहे, की आम्हाला विसरु नका, आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत.  

सायबराबादचाही झाला नाही
उपयोगदेशात २००४ साली लोकसभा निवडणूक होती. त्यापूर्वी आंध्र प्रदेशात विधान सभेची निवडणूक होती. तेलगू देसम हा पक्ष एनडीएसोबत केंद्रात होता. त्यांचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रचा विशेषत: हैदराबादेचा मोठा विकास केला होता. आयटी उद्योग त्यांनी हैदराबादेत आणले होते. हैदराबादेला, सायबराबाद म्हणून संबोधले जाऊ लागले होते. देशात फिलगुड, इंडिया शायनिंगचे कॅम्पेन आणि हैदराबादेचा विकास यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्षच आंध्रात सत्तेत येईल, असे मानले जाऊ लागले होते. मात्र निकाल वेगळाच लागला. चंद्राबाबूंना धोबीपछाड देऊन वायएसआर रेड्डी यांनी काँग्रेसला आंध्र प्रदेशाची सत्ता मिळवून दिली.

मी सोनिया गांधींची सदिच्छा भेट घेतली. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. नो कमेंटस् -अनिल अंबानी
१२ मे २००४ -नवी दिल्ली

‘मोदी अजिंक्य नाहीत, त्यांनी २००४ वर्ष लक्षात ठेवावे’-सोनिया गांधी,
१० एप्रिल २०१९ -नवी दिल्ली

मिलिंद इज बेस्ट फॉर साऊथ मुंबई. त्यांना दक्षिण मुंबईतील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक परिस्थितीची चांगली जाण आहे. त्यामुळेच दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा हे बेस्ट आहेत. – मुकेश अंबानी,
१८ एप्रिल २०१९ -मुंबई

मुकेश अंबानी हे देशातले सर्वात पॉवरफुल उद्योजक जर काँग्रेसच्या मिलिंद देवरांना पाठिंबा देत असतील, तर हे देशाला सांगण असतं की भाजपच सरकार जाणार आहे, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही.-राज ठाकरे,
२३ एप्रिल २०१९, मुंबई

First Published on: April 25, 2019 6:10 AM
Exit mobile version