आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना आता बेस्ट ऑफ फाइव्हचा पर्याय

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना आता बेस्ट ऑफ फाइव्हचा पर्याय

आयसीएसई मंडळाने त्यांच्या तिन्ही ग्रुपचे विषय एकत्रित केल्याने शिक्षण विभागाने आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्हऐवजी पहिल्या पाच विषयांच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता शिक्षण विभागाने आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांना बेस्ट ऑफ फाइव्हचा पर्याय उपलब्ध केला आहे. परंतु त्यासाठी त्यांना प्रवेश अर्ज भरताना आयसीएसईच्या अ व ब ग्रुपमधील विषयांचे गुण भरणे बंधनकारक केले आहे. अ व ब ग्रुपमधील विषयांच्या आधारे प्रवेश घेतल्यास आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह पद्धतीने प्रवेश घेता येणार आहे.

आयसीएसई मंडळाने यंदाच्या परीक्षेत त्यांच्या ‘अ’, ‘ब’ व ‘क’ या तिन्ही ग्रुपमधील विषय एकत्र केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ग्रुप ‘क’मधील विषय अधिक आले. ‘क’ ग्रुपमधील विषयांमध्ये 50 गुणांपर्यंत अंतर्गत गुण देण्यात येत असल्याने या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यामुळे अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्हऐवजी पहिल्या पाच विषयांच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. अनेक विद्यार्थी व पालकांनी बेस्ट ऑफ फाइव्ह पद्धतीने अर्ज भरले होते. त्यामुळे ही पद्धत कायम ठेवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने नव्याने अध्यादेश काढले आहेत. यामध्ये बेस्ट ऑफ फाइव्हचा ज्या विद्यार्थ्यांना लाभ घ्यावयाचा आहे त्यांनी सहा विषय घेऊन उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे केवळ ग्रुप ‘अ’ व ‘ब’मधील कोणत्याही पाच विषयांचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी अर्जात भरावेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप ‘क’ मधील गुणांच्या आधारे प्रवेश घ्यायचा आहे. त्यांचे तिन्ही गु्रपमधील सात विषयांचे 700 पैकी गुण अर्जात भरावेत असे निर्दे शिक्षण विभागाने दिले आहेत. यासंदर्भातील सूचनाही शिक्षण विभागाकडून उपसंचालक कार्यालयाला दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्जाच्या भाग 1 व 2 मध्ये आवश्यक सुधारणा करता यावी यासाठी त्यांनी संबंधित आयसीएसई शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावर 4 जुलैपर्यंत जाऊन कराव्यात असे आदेशही राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ फाइव्ह पद्धतीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी मार्गदर्शन केंद्रावरू जाऊन आपल्या अर्जात बदल करून घ्यावेत असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on: June 30, 2019 4:55 AM
Exit mobile version