आयडॉल परीक्षेच्या गोंधळाचे खापर शिक्षकांच्या माथी

आयडॉल परीक्षेच्या गोंधळाचे खापर शिक्षकांच्या माथी

आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी नियुक्त केलेल्या खासगी संस्थेच्या अपयशाचे खापर विद्यापीठाकडून शिक्षकांवर फोडण्यात येत आहे. परीक्षेच्या गोधळानंतर झालेल्या बैठकीत कुलगुरूंकडून शिक्षकांची कानउघडणी करण्यात आली आहे. मात्र आयडॉलमधील बहुतांश शिक्षकांच्या नियुक्तीचा कालावधी संपला असून, त्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. शिक्षकांच्या परिस्थितीचा विद्यापीठाकडून गैरफायदा घेण्यात येत आहे. याबद्दल शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तांत्रिक बिघाडामुळे आयडॉलच्या परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढावली. त्यानंतर कुलगुरूंनी तातडीने आयडॉलच्या शिक्षकांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कुचकामी ठरलेल्या सॉफ्टवेअर कंपनीच्या अधिकार्‍यांना धारेवर धरण्याऐवजी ज्या शिक्षकांनी चार महिन्यांपासून वेतन मिळत नसतानाही प्रामाणिकपणे प्रश्नसंच तयार केले. विद्यार्थ्यांची माहिती जमा केली व परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी परीक्षेच्या आदल्या रात्रीपर्यंत विद्यापीठामध्ये काम करत होते. त्यांच्यावरच कुलगुरूंनी तोंडसुख घेतले. नियुक्तीचा कालावधी संपून दोन महिने उटलले असून, चार महिन्यांचे वेतन मिळाले नसतानाही काम करणार्‍या शिक्षकांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम कुलगुरूंनी आपल्या कृत्यातून केल्याचा आरोप मुक्ता संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी केला.

आयडॉलची मान्यता रद्द होत असताना तात्पुरत्या आणि कंत्राटी प्राध्यापकांच्या सहाय्याने मान्यतेची मुदतवाढ मिळाली. याचा विद्यापीठ प्रशासनाला विसर पडल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या प्राध्यापकांच्या नियुक्त्या संपल्या आहेत त्या पुन्हा कराव्यात, थकीत वेतन अदा करावे आणि प्राध्यापकांना सन्मानाची वागणूक अधिकार्‍यांनी द्यावी अशी मागणी विद्यापीठ सिनेट सदस्य व मुक्ता संघटनेचे महासचिव प्रा. वैभव नरवडे यांनी केली आहे.

First Published on: October 9, 2020 1:15 PM
Exit mobile version