होळीसाठी झाडे तोडाल तर तुरुंगाची हवा खाल

होळीसाठी झाडे तोडाल तर तुरुंगाची हवा खाल

झाडांची कत्तल

होळी सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात होणारी वृक्ष तोड रोखण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. त्यामुळे जर सार्वजनिक परिसरातील झाडांसह एखाद्या सोसायटी किंवा खाजगी आवारातील झाड तोडल्याचे अथवा झाडांच्या फांदी छाटल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उद्यान विभागाचे कर्मचारी सतर्क

होळी सणाच्यावेळी सार्वजनिक रस्त्याच्या आजूबाजूची, सार्वजनिक परिसरातील तसेच खाजगी आवारातील झाडे होळीमध्ये जाळण्यासाठी तोडली किंवा छाटली जाण्याची शक्यता असते. यामुळे झाडांची संख्या कमी होऊन पर्यावरणालाही हानी पोहचते. या बाबींना प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे अधिक सतर्क झाले आहेत. आपआपल्या क्षेत्रात लक्ष ठेवून आहेत. या अनुषंगाने सार्वजनिक परिसरातील झाडांसह एखाद्या सोसायटी किंवा खाजगी आवारातील झाड तोडल्याचे किंवा झाड छाटल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात अनधिकृत आणि बेकायदेशीर वृक्ष छाटणी होत असल्याचे आढळून आल्यास त्याबाबत स्थानिक पोलीस स्टेशन, महापालिकेच्या विभाग कार्यालयातील उद्यान खाते यांच्याकडे नागरिकांना तक्रार करता येईल. याबाबत ’१९१६’ या दूरध्वनी क्रमांकावर देखील तक्रार नोंदविण्याची सुविधा पूर्वीप्रमाणेच उपलब्ध आहे. या अनुषंगाने नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने प्रतिकात्मक ’होळी’ साजरी करण्याचे आवाहन उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.

एक आठवडा ते एक वर्षांपर्यंतचा कारावास

’महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ च्या ’कलम २१’ मधील तरतूदींनुसार वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे किंवा तोडण्यासाठी कारणीभूत होणे, हा अपराध असून या अपराधाकरिता कमीतकमी १ आठवडा ते १ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच यासाठी कमीतकमी रुपये १ हजार ते रुपये ५ हजार एवढा दंड होऊ देखील होऊ शकतो.


हेही वाचा – महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर ‘मराठी’ला संजीवनी, अर्थसंकल्पात भरीव तरतुद


 

First Published on: March 6, 2020 8:47 PM
Exit mobile version