आरे वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून केला राग व्यक्त

आरे वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून केला राग व्यक्त

आदित्य ठाकरे

आरेतील कॉलनीतील झाडांवर शुक्रवारी रात्री कुऱ्हाड चालवल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला असून शिवसेना युवा नेता आदित्य ठाकरे यांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. ‘ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं’, अशी टीका युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो कारशेड येथील वृक्षतोडीवरुन केली आहे. आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडप्रकरणी मुंबई हायकोर्टाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यास सुरूवात झाली आहे. या मुद्द्यावरुन ट्विटवर #AareyForest हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला.

काय म्हणाले ट्विटरवरून

‘आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा जो घाट रचला आहे तो लज्जास्पद आहे. ज्या तत्परतेने मेट्रोचे अधिकारी आरे काॅलनीतील झाडं तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवं. येथील झाडं तोडण्यापेक्षा या अधिकाऱ्यांनी पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ नष्ट केले तर अधिक बरं होईल ना?,’ अशी टिका आदित्य यांनी ट्विटवरुन केली आहे.

याच ट्विटखाली केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये आदित्य यांनी शिवसैनिकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. ‘आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोड करण्याचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे,’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

First Published on: October 5, 2019 9:40 AM
Exit mobile version