नालासोपारा हायवे खड्ड्यात

नालासोपारा हायवे खड्ड्यात

(नालासोपारा-हायवे या मुख्य रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे.)

नालासोपारा पूर्व ते हायवेला जोडणार्‍या रस्त्यावर मोठाले खड्डे पडले असून त्यामुळे अपघात होऊन रस्ता मृत्यूचा सापळा बनू लागला आहे. मात्र, रस्त्यावरील खड्डे अद्याप भरले जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवनपासून मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर मोठाले खड्डे पडले आहेत. खड्डयात पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डयांचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत. मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

हा रस्ता एमएमआरडीएने बनवला आहे. सध्या रस्त्याचे पालकत्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पहिल्या पावसात धानीव बाग येथे मोठा खड्डा पडला होता. त्यानंतर ठिकठिकाणी खड्डे पडू लागले आहेत. या खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. खड्ड्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दुचाकीस्वारांना खड्ड्यातून वाट काढत जावे लागत आहे. त्याचबरोबर या खड्ड्यांमुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी येथील नागरीक करत आहेत.

First Published on: August 14, 2019 5:37 AM
Exit mobile version