सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या अहवालात समोर आले…

सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या अहवालात समोर आले…

मुंबई : गेल्या वर्षी गणेश विजर्सन मिरवणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये प्रभादेवीमध्ये हाणामारी झाली होती. यावेळी सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याची तक्रार दादर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. मात्र, आज पोलिसांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालातून सदा सरवणकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचा अहवाल पोलिसांनी आज सादर केला आहे. विशेष म्हणजे ती बंदूक सदा सरवणकर यांचीच होती, मात्र गोळी झाडणारा व्यक्ती दुसराच असल्याचे पोलिसांच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

गेल्या वर्षी आपल्या लाडक्या बापाला निरोप देताना जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. पण प्रभादेवी परिसरात काही वेगळेच घडत होते. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेना सोडली. या ४० आमदारांमध्ये सदा सरवणकर यांचाही समावेश होता. सदा सरवण हे फार पूर्वीपासून दादर आणि आसपासच्या परिसरात शिवसेनेतील मुख्य नेता म्हणून प्रसिद्ध होते. मात्र त्यांनी शिवसेना सोडल्याने या परिसरात नाराजीचे वातावरण होते. गणेश विसर्जन मिरवणुकीत याचाच प्रत्यत आला. विसर्जन मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही काळ वातावरण तापले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर दोन्ही गट शांत झाले. पण त्याच रात्री दोन्ही गटात मध्यरात्री पुन्हा हाणामारी झाली होती. या हाणामारीवेळी सदा सरवणकर यांच्याविरोधात दादर पोलीस ठाण्यात गोळीबाराची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतूस आणि सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने तपासण्यासाठी घेतले. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात घटनास्थळावरून जप्त केलेले काडतूस आणि बंदुकीचे नमुने जुळले होते. मात्र आज पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार सरवणकरांनी गोळी चालवली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

नेमकी घटना काय?
गेल्या वर्षी सप्टेंबर 2022 मध्ये प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटाने मंच उभारले होते. ठाकरे गटाच्या शेजारीच शिंदे गटाने आपला मंच उभारला होता. यावेळी या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द वापरले. ज्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर समर्थक आपापसात भिडले. यावेळी दोन्ही गटातील समर्थकांनी एकमेकांना शिवीगाळ केली, मात्र हे प्रकरण इथेच थांबल नाही तर या वादाचे रुपांतर मध्यरात्रीतील राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. या प्रकरणी दादर पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल झाला.

First Published on: March 10, 2023 7:02 PM
Exit mobile version